पुणे । टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या 29वर्षीय प्रजनेश गुन्नेश्वरणला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे या स्पर्धेतील एकेरीतील आव्हान संपूष्टात आले आहे.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत अमेरिकेच्या मायकेल मोह याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या प्रजनेश गुन्नेश्वरणचा 7-5, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
1तास 14मिनिटे चाललेल्या या सामन्यात मायकेलने आक्रमक खेळ करत पाहिल्याचं गेममध्ये प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक केली. पिछाडीवर असलेल्या प्रजनेशने पुनरागमन करत सहाव्या गेममध्ये मायकेलची सर्व्हिस भेदली व सामन्यात 3-3अशी बरोबरी साधली.
त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व सामन्यात 5-5अशी स्थिती निर्माण झाली. 11व्या गेममध्ये मायकेलने चपळाईने खेळ करत प्रजनेशची सर्व्हिस पुन्हा ब्रेक केली व स्वतः ची सर्व्हिस राखत हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील प्रजनेशला सामन्याच्या अखेरपर्यंत सूर गवसला नाही. या सेटमध्ये मायकेलने वर्चस्व राखत तिसऱ्या गेममध्ये प्रजनेशची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून विजय मिळवला.
अन्य लढतीत सातव्या मानांकित स्पेनच्या जौमी मुनार याने मालदेवीयाच्या राडू अल्बोटचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(4)असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. बेलारूसच्या स्टीव्ह दर्कीसने सहाव्या मानांकित स्पेनच्या रॉबेर्टो बाईनाचा 6-3, 6-4असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
मायकेल मोह(यूएसए)वि.वि.प्रजनेश गुन्नेश्वरण(भारत) 7-5, 6-3;
स्टीव्ह दर्कीस(बेलारूस)वि.वि.रॉबेर्टो बाईना(स्पेन)(6) 6-3, 6-4;
जौमी मुनार(स्पेन)(7)वि.वि.राडू अल्बोट( मालदेवीया) 6-2, 7-6(4);
दुहेरी गट: पहिली फेरी:
केविन कॅवियस /आंद्रियास मियास(जर्मनी)वि.वि.हबर्ट हुरकाझ(पोलंड)/बेनॉय पेर(फ्रांस) 7-5, 6-3.