इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका पार पडली असून आता टी२० आणि वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकांनंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्याची संधी आहे.
सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभूत केल्याने कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. तर वनडे आणि टी२० क्रमवारीत भारतीय संघ प्रत्येकी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
…तर टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येऊ शकतो भारतीय संघ
सध्या भारतीय संघ २६८ गुणांसह आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा संघ २७५ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला जर या क्रमवारीत इंग्लंडला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवायचा असेल तर मोठी कामगिरी करावी लागणार आहे.
येत्या १२ मार्चपासून भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत जर भारतीय संघाने ४-१ किंवा ५-० अशा फरकाने विजय मिळवला तर भारताला आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवता येईल.
जर या मालिकेत भारताने ४-१ अशा फरकाने विजय मिळवला तर भारताचे २७२ गुण होतील आणि इंग्लंडचे २६९ गुण होतील. त्यामुळे भारत अव्वल क्रमांकावर येईल. तसेच जर भारताने ५-० असा विजय मिळवला तर भारतचे २७४ गुण होतील आणि इंग्लंडचे २६७ गुण होतील.
…तर वनडे क्रमवारीत भारतीय संघ येऊ शकतो अव्वल क्रमांकावर
इंग्लंड विरुद्ध टी२० मालिका संपल्यानंतर २३ मार्चपासून ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत जर भारताने ३-० अशा फरकाने विजय मिळवल्यास वनडे क्रमवारीतही भारत अव्वल क्रमांकावर येऊ शकतो. सध्या भारतीय संघ ११७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर १२३ गुणांसह इंग्लंड संघ अव्वल क्रमांकावर आहे.
त्यामुळे जर वनडे मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने विजय मिळवला तर भारताचे १२० गुण होतील. तर इंग्लंडचे ११९ गुण होतील. त्यामुळे भारत इंग्लंडला मागे टाकत अव्वल क्रमांकावर येईल.
अशी कामगिरी करणारा पहिला संघ बनू शकतो भारत
जर भारताने वनडे आणि टी२० क्रमवारीतही अव्वल क्रमांक मिळवला, तर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकाचवेळी अव्वल क्रमांक मिळवणारा भारत पहिलाच संघ बनू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –