भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर- गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात आपले कसोटी पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर याने गोलंदाजी सोबतच फलदाजीत देखील उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे. मात्र अशातच संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांनी सुंदरबद्दलचा एक गौप्यस्फोट केला असून, समन्यापूर्वी सुंदरकडे पॅड नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुंदर हा केवळ नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी संघासोबत जोडला होता. मात्र प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपले कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. सुंदर केवळ नेट बॉलर म्हणून संघासोबत असल्याने त्याच्याकडे कसोटीसाठीचे पांढरे पॅड नव्हते. त्यामुळे सामन्याच्या अगोदर त्याला पॅड मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली होती. सुंदर संपूर्ण मालिकेमध्ये वन-डे क्रिकेटसाठी वापरत असलेल्या निळ्या पॅड्सनेच सराव करत होता.
श्रीधर यांचे वक्तव्य
याविषयी तेलंगणा टुडेसोबत बोलताना श्रीधर यांनी सांगितले की, “सुंदरकडे कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते. भारतीय संघाने आणि सपोर्ट स्टाफने त्याच्यासाठी पॅड्स शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याची उंची जास्त असल्यामुळे पाहिजे तसे पॅड्स भेटत नव्हते. आम्ही ऑस्ट्रेलिया संघाकडून पॅड्स घेण्याचा विचार केला. पण कोरोनामुळे ते त्यांचे पॅड्स देऊ शकत नव्हते. अखेर ब्रिस्बेन कसोटी सुरू झाल्यानंतर आम्ही दुकानात गेलो आणि नवीन पॅड्स खरेदी केले.”
ब्रिस्बेन कसोटीत सुंदरने दिले महत्त्वपुर्ण योगदान
सुंदरने ब्रिस्बेन येथे आपले कसोटी पदार्पण करत उत्तम कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डावात 3 प्रमुख फलंदाजांना बाद केले. तसेच भारताच्या पहिल्या डावात शानदार 62 धावांची खेळी केली. सुंदरने शार्दुल ठाकुरसोबत सातव्या विकेटसाठी शानदार 123 धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले होते.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही सुंदरने एक विकेट घेतली होती. सुंदरचे विशेष कौतुक झाले ते भारताच्या दुसऱ्या डावातील त्याच्या आत्मविश्वासपूर्ण खेळीने. भारताच्या दुसऱ्या डावात अतिशय महत्त्वाच्या क्षणी सुंदरने 22 धावांची खेळी करत संघाला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…