साउथम्पटन| विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२० जून) न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या डावात २१७ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून अजिंक्य रहाणे ४९ आणि विराट कोहलीच्या ४४ धावांच्या खेळीनंतर भारतीय संघाची फलंदाजी डगमगली. एकामागोमाग भारताचे गडी बाद झाल्याने न्यूझीलंड संघाने सामन्यावर ताबा मिळवला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला भक्कम सुरुवात दिली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंड संघ २ बाद १०१ धावा अशा स्थितीत आहे.
अशात भारतीय संघाच्या तिसऱ्या दिवशीच्या निराशाजनक प्रदर्शनामागे त्यांच्याकडून झालेल्या काही चुकांचा समावेश आहे. याच चुकांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
शमीपुर्वी बुमराहला फलंदाजीला पाठवले-
पहिली चूक म्हणजे भारतीय संघाने शेवटच्या फलंदाजीच्या क्रमवारीत उलटफेर केला. या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने एकूण २१७ धावा केल्या. भारतीय संघाकडून रहाणे आणि कोहली यांच्या भागीदारीने काही काळासाठी डाव सावरून ठेवला होता. परंतु, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या दोन सत्रातच भारतीय फलंदाजी गडगडली. कायल जेमिसनच्या भेदक माऱ्यापुढे विराट बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेदा, आर अश्विनही लवकरच माघारी परतले.
मग भारतीय व्यवस्थापनाने प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीपुर्वी इशांत शर्माला खेळवले. शर्मा बाद झाल्यावर जसप्रीत बुमराला पाठविण्यात आले. शर्माचे तरी ठीक आहे. परंतु, बुमरालासुद्धा शमीच्या आधी का पाठवले? भारतीय संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय समजण्यापलीकडे होता. कारण की, शर्मा आणि बुमराहपेक्षा चांगली फलंदाजी शमी करतो. शमीने २०१४ला नॉटिंघम कसोटीत इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावले होते. शमीने त्या सामन्यत ८१ चेंडूत ५१ धावांची नाबाद खेळी केली होती. तसेच त्याच्याकडे लांब फटके मारण्याची ताकद सुद्धा आहे.
जडेजाला ४२ व्या षटकापर्यंत दिली नाही गोलंदाजी-
दुसरी चूक अशी झाली की, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला फलंदाजीसोबत एक अतिरिक्त गोलंदाज म्हणून सुद्धा खेळवले गेले आहे. रवीचंद्रन अश्विनला १५व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली. परंतु, जडेजाला ४३व्या षटकात गोलंदाजी देण्यात आली. जर जडेजाला इतक्या उशिरा गोलंदाजी द्यायची होती तर, त्याच्याजागी हनुमा विहारी एक अतिरिक्त फलंदाज म्हणून खेळवले असते तर चालले असते.
खराब शॉट खेळून गमावल्या विकेट्स-
त्याचप्रमाणे तिसरी चूक अशी झाली की, चांगली सुरुवात मिळाल्यानंतर कोहली आणि रहाणेने उरलेला दिवस खेळून काढला. परंतु कोहलीच्या विकेटनंतर रहाणेने न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षण माहिती असताना सुद्धा तिकडेच फटका मारला आणि बाद झाला. रिषभ पंतने यष्टीच्या खूप बाहेरून जात असलेल्या चेंडूला जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो सुद्धा खराब फटका खेळून बाद झाला. अश्विनने आल्या आल्या सुंदर फटकेबाजी केली. परंतु, अश्विनला अति घाई नडली. त्यानेसुद्धा यष्टीच्या बाहेरून आलेल्या चेंडूचा सामना केला आणि तो सुद्धा बाद झाला.
आता न्यूझीलंडच्या फलंदाजांना २१७ धावांच्या आत रोखण्यास भारतीय संघाचे गोलंदाज यशस्वी होतात का? की न्यूझीलंड संघाचे फलंदाज पहिल्याच डावात आघाडी घेतात?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘सलामी जोडीनंतर न्यूझीलंडची अजून एक मोठी विकेट मिळाली असती, पण…,’ गिलचे वक्तव्य
पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान
‘मूड स्विंग झाला, पण चेंडू नाही’; टिम इंडियाच्या सुमार गोलंदाजीवर माजी क्रिकेटर नाराज