कसोटी क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. १८७७ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात झाली. भारतात इंग्रजांचे राज्य असल्याने भारत देखील या खेळाच्या प्रेमात पडला. भारताने आपली पहिली कसोटी इंग्लंड विरुद्ध १९३२ रोजी खेळली.
सध्याच्या काळात भारतीय क्रिकेट आपल्या एकाहून एक दर्जेदार फलंदाजांसाठी प्रसिद्ध असले तरी गोलंदाजांनी सुद्धा तितकीच तोलामोलाची साथ फलंदाजांना दिली आहे. बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना व चंद्रशेखर या फिरकी तिकडीने जगभर धुमाकूळ घातला होता. त्यानंतरही अनेक सरस गोलंदाज भारतासाठी खेळले.
कसोटी क्रिकेटमध्ये भारताला काही असे गोलंदाज मिळाले, ज्यांनी आपल्या नावाचा डंका जगभर वाजवला. अशाच, भारतासाठी कसोटी मध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांविषयी आपण जाणून घेऊया.
५) झहीर खान
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांची नावे तितकीशी संस्मरणीय राहिली नाही. २००० नंतर भारतीय संघ नव्याने बांधला जात असताना सौरव गांगुलीच्या नेतृत्वात झहीर खानने भारतीय संघात स्थान मिळवले. त्यानंतर निवृत्त होईपर्यंत, जवळपास १५ वर्ष त्याने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व केले.
भारताचा गोलंदाजीचा कर्णधार म्हटला गेलेल्या झहीर खानने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात शानदार यश संपादन केले. झहीरने भारताकडून ९२ कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये ३११ बळी टिपले. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीर खान पाचव्या स्थानावर आहे.
४) आर आश्विन
चालू दशकात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन सर्वोत्तम फिरकी गोलंदाज म्हणून समोर आला आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघात अश्विनची आता जागा बनत नसली तरी, कसोटी क्रिकेटमध्ये अश्विन अजूनही भारतासाठी क्रमांक एकचा गोलंदाज आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २५०, ३०० व ३५० बळी पूर्ण करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने ३६५ बळी घेतले आहेत. अश्विनची अजून बरीचशी कारकीर्द शिल्लक आहे. त्यामुळे तो कपिल देव व हरभजन सिंग यांना मागे टाकण्याचा प्रयत्न नक्की करेल.
३) हरभजन सिंग
भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात ऑफस्पिन गोलंदाजी करणारे अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले. या गोलंदाजांपैकी सर्वात यशस्वी ऑफस्पिनर म्हणजे हरभजन सिंग. हरभजन सिंग २००० पासून भारतीय संघात सोबत आहे. मात्र, २०१६ पासून त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.
हरभजन सिंगने कसोटी क्रिकेटमध्ये एकट्याच्या जीवावर भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. हरभजन कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत १०३ कसोटी सामने खेळले असून ४१७ बळी घेतले आहेत. वयाची चाळीशी गाठल्यामुळे तो पुन्हा भारतीय संघाकडून खेळण्याची शक्यता अगदी कमी आहे.
२) कपिल देव
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व महान अष्टपैलू कपिल देव यांचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. युवा भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी ते कायम आदर्श राहिले आहेत. कपिल देव यांनी भारतीय संघासाठी बर्याच काळासाठी प्रमुख वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावली. कपिल यांच्याच नेतृत्वात भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
अष्टपैलू असले तरी ते भारताचे सर्वात वेगवान गोलंदाज होते. कपिल देव भारतासाठी ४०० कसोटी बळी घेणारे पहिले गोलंदाज ठरले. त्यांनी आपल्या अभूतपूर्व कसोटी कारकीर्दीत एकूण १३१ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये त्यांना ४३४ बळी मिळविण्यात यश आले. कपिल देव हे भारतासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरले आहेत.
१) अनिल कुंबळे
कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांची यादीत ज्यावेळी बनते त्यावेळी, भारताच्या अनिल कुंबळेचा समावेश त्यात असतो. मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांच्यानंतर कुंबळेच्या नावे सर्वाधिक बळी आहेत. आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर कुंबळेने भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
‘जंबो’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुंबळेने आपल्या कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये वेगळी छाप पाडली. भारताकडून कसोटी खेळताना त्याने ६१९ बळी आपल्या नावे केले. भविष्यात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कुंबळेचा हा विक्रम मोडण्यासाठी अपार मेहनत करावी लागेल.
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश
महत्त्वाच्या बातम्या –
पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी
कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे हुकले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कसोटी पदार्पण
शतक ठोकल्यावर जीभ काढणारा खेळाडू म्हणतोय, ‘२०२१ मधील टी२० विश्वचषकात खेळेल की नाही माहित नाही’