दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ मंगळवारी(२६ ऑक्टोबर ) झालेल्या सामन्यात आमनेसामने होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने चांगली कामगिरी करून ८ गडी राखून विजय मिळवला. हा सामना सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघातील यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहीमेला समर्थन करण्यास नकार दिला होता. डी कॉकच्या या निर्णयामुळे संघाचा कर्णधार टेंबा बवुमा नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते.
दुबईच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने १० चेंडू आणि ८ गडी राखून वेस्ट इंडिज संघावर विजय मिळवला. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने सर्व खेळाडूंना ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या मोहीमेला समर्थन करण्यासाठी सांगितले होते. परंतु, डी कॉकने असे करण्यास नकार दिला होता. तो या सामन्यातून बाहेर झाला. यासह त्याने मोठ्या वादाला देखील आमंत्रण दिले आहे.
हा सामना झाल्यानंतर जेव्हा कर्णधार टेंबा बवुमाला संघाच्या कामगिरीबाबत आणि डी कॉकच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला की, “खरं सांगू तर जेव्हा आम्हाला ही बातमी मिळाली तेव्हा एक संघ म्हणून आम्ही थोडे मागे ढकलले गेलो. तो या संघातील मुख्य खेळाडू आहे. तो संघातील फक्त एक फलंदाज नव्हे तर संघातील वरिष्ठ खेळाडू देखील आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्याच्या अनुपस्थितीत हेन्रीच क्लासेनला यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडावी लागली. परंतु शेवटी आमच्यासाठी ही चांगली संधी होती. आम्हाला देशासाठी चांगले खेळायचे होते आणि याची खात्री करून घ्यायची होती की, आम्ही कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करू शकतो.” या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. हा आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला विजय होता.