दिवा गावदेवी क्रीडा महोत्सव मैदान, दिवा पूर्व येथे सुरू असलेल्या ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आज अंतिम दिवशी उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. महिला विभागात ठाणे मनपा, डब्लू. टी. ई. तर पुरुष विभागात एयर इंडिया, सेंट्रल बँक संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
महिला विभागात झालेल्या डब्लू. टी. ई. विरुद्ध इमरॉल्ड इन्फ्रा यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डब्लू. टी. ई. उपनगर संघाने ३५-२० असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. चढाईत सायली केरीपले, साक्षी गावडे तर पकडीमध्ये सेन्हल शिंदे व अंकित जगताप यांनी चांगला खेळ केला.
देना बँक विरुद्ध ठाणे मनपा यांच्यात ठाणे मनपा संघाने २५-२० अशी बाजी मारली. मध्यंतरापर्यत १०-०८ अशी आघाडी ठाणे मनपा संघाकडे होती. कोमल देवकर आणि तेजस्विनी पोटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. देना बँक कडून पूजा यादव व पौर्णिमा जेधे यांनी चांगले प्रयत्न केले पण त्याना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
तर पुरुष विभागात दोन्ही उपांत्य फेरीचे सामने एकतर्फी झाले. एयर इंडियाने ३९-०९ असा देना बँकचा पराभव केला. तर सेन्ट्रल बँकने न्यु इंडिया इन्शुरन्स संघावर ३८-१६ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
ठाणे महापौर चषक अंतिम सामाने:
महिला विभाग:
ठाणे मनपा विरुद्ध डब्लू. टी. ई.उपनगर
पुरुष विभाग:
एयर इंडिया विरुद्ध सेंट्रल बँक