पुणे। सृष्टी केदारे, प्रिया मरगज व श्रेया भोसले यांनी आपापल्या गटामध्ये अव्वल कामगिरी बजावताना महाराष्ट्र शासन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वात वेगवान धावपटू’ या राज्यस्तरीय टॅलेंट सर्च स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या ‘फिट इंडिया’ अंतर्गत ‘गो गर्ल गो’ उपक्रमाअंतर्गत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया व एचडीएफसी बँकेचे सारंग दानी व श्रीमती शाळीग्राम यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण शोभा पंडित, शकुंतला खटावकर, गुरुबन्स कौर, किशोरी शिंदे, पूजा घाटकर, दीक्षा दिंडे, रेशमा पाटील व अंकिता गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, धीरज मालुसरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहाय्यक क्रीडा संचालक नीलिमा अडसूळ व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धेत ६-९ या वयोगटात नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कूलच्या सृष्टी केदारेने १५.१ सेकंद वेळ नोंदविताना विजेतेपदाला गवसणी घातली. सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाले, हिरवेच्या प्रीतम खताळने दुसरे (१५.४ सेकंद) तर सातारच्याच गुरुकुल प्रायमरी स्कूलच्या सई धाडगेने तिसरे (१५.५ सेकंद) स्थान राखले. अनन्या मगरने (बीपीकेसी स्कूल, कहान, नागपूर) चौथे, कस्तुरी चव्हाणने पाचवे (अनंतराव कुलकर्णी इग्लिश मेडियम स्कूल, जुन्नर) तर आर्या सुपेकरने (पवार पब्लिक स्कूल, हडपसर, पुणे ग्रामीण) सहावे स्थान राखले.
१० ते १३ वर्षांखालील गटात निगडी येथील अमृता विद्यालयाच्या प्रिया मरगजने १३.७ सेकंद वेळ नोंदवीत विजेतेपद पटकावले. मुंबईच्या फादर एंजल मल्टीपर्पज स्कूलच्या आर्या दातारेने दुसरे (१३.८ सेकंद) तर पुण्यातील विखे पाटील स्कूलच्या यशश्री सकपाळने तिसरे (१३.९ सेकंद) स्थान राखले. वेदिका मुळेने चौथे (फादर एंजल मल्टीपर्पज स्कूल, मुंबई), खुशी कुलकर्णीने पाचवे (अभिनव विद्यालय, पुणे) तर अभिलाषा मोरेने (सिम्बायोसिस, नाशिक) सहावे स्थान राखले.
१४ ते १८ या वयोगटात मुंबईच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या श्रेया भोसलेने १२.४ सेकंदात सीमारेषा पार करत विजेतेपद पटकावले. ज्ञानप्रबोधिनीच्या ऋजुता भोसलेला दुसऱ्या (१२.५ सेकंद) तर मुंबईच्या फादर एंजल मल्टीपर्पज स्कूलच्या प्राची शेट्टीने तिसऱ्या (१२.६ सेकंद) स्थानावर समाधान मानावे लागले. पृथ्वी साळुंखेने चौथे (सरहद स्कूल, पुणे), काव्या मयेकरने पाचवे (सेंट मेरीज हायस्कूल, मुंबई) तर मधुरा खांबेने सहावे (श्री स्वामी समर्थ प्रशाला, पुणे) स्थान राखले.
स्पर्धेत प्रथम स्थान पटकावणाऱ्या खेळाडूला ७५ हजार, द्वितीय स्थान पटकावणाऱ्या खेळाडूला ५० हजार तर तृतीय स्थान पटकावणाऱ्या खेळाडूला २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी एचडीएफसी बँकेने प्रायोजकत्व दिले होते. यावेळी राणी लक्ष्मीबाई सैनिकी स्कूलच्या विद्यार्थीनीनी शिस्तबद्ध पद्धतीने बँड वादन करताना खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुणे जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अथर्व कुलकर्णी, तुषार गायकवाड, अभिजित खोपडे, नीता सलगर, स्नेहल खवरे, रोहिणी मोहिते, साक्षी पाटील, नम्रता तायडे, साक्षी जाधव ऋतुजा गोरे, हेमंत गौतमी, मिताली वाणी, किरण साठे, पार्थ जगताप, ऋत्विक जोशी यांचा समावेश आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.