अंबेजोगाई(जि.बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 46 व्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कुमार गटात पालघर, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर आणि कुमारी गटात पुणे, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. कुमार गटात उपांत्य फेरीत ठाणे संघाची पालघर व कोल्हापूर संघाची रत्नागिरी संघाशी गाठ पडेल. कुमारींमध्ये पुणे – औरंगाबाद व बीड- कोल्हापूर अशी लढत होईल.
तिसऱ्या दिवशी झालेल्या सायंकाळच्या सत्रात उपांत्य पुर्व फेरीच्या कुमारी गटात पुणे संघाने मुंबई शहर संघावर 28-19 असा विजय मिळवित धुळ चारली. मध्यंतराला पुणे संघाकडे 10-9 अशी केवळ एक गुणांची आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे व समृध्दी कोळेकर यांनी यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. तर पायल वसवे हिने निर्णायक अशा उत्कृष्ट पकडी घेतल्याने पुणे जिल्हा संघाला सहज विजय मिळविणे शक्य झाले. मुंबईशहर संघाच्या ऋणाली भुवड व प्रतिक्षा तांडेल यांनी चौफेर चढाया करीत विजयाची पराकाष्टा केली मात्र त्यांना पुण्याचे आक्रमण व बचाव दोन्ही भेदता न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. मानसी पाटील हिने काही चांगल्या पकडी घेतल्या.
दुसऱ्या झालेल्या उपांत्यपुर्व फेरीमध्ये औरंगाबाद संघाने पालघर संघाचा 34-18 धुव्वा उडवीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला औरंगाबाद संघाकडे 17-7 अशी आघाडी होती. औरंगाबादच्या सुवर्णा लोखंडे व अचल चव्हाण यांनी चांगला खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला व निलम पाटीलने देखील आपल्या खेळाची चुणूक दाखवली. पालघरच्या पुजारी मोक्षा व हर्षा शेट्टी यांनी उत्कृष्ट खेळ करीत चांगली टक्कर दिली.
कोल्हापूर संघाने अहमदनगर संघावर 52-9 अशी एकतर्फी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 30-2 अशी निर्णायक आघाडी होती. कोल्हापूरच्या मृणाली टोणपे व अनुराधा पाटील व प्रतिक्षा धामणेकर यांनी आक्रमक चढाया करीत आपल्या संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यांना स्नेहल जोंदाळ व श्रुतिका रेडेकर यांनी काही चांगल्या पकडी घेत मोलाची साथ दिली. अहमदनगरच्या सविता शिंदे व भक्ति शिंदे यांनी चांगल्या चढाया करीत काहीसा प्रतिकार केला. तर श्रावणी गोवेकर व स्वाती पारठे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.
तसेच अत्यंत रोमहर्षक झालेल्या अटितटीच्या सामन्यात यजमान बीड संघाने मुंबई उपनगर संघावर 32-31 अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बीड संघ 13-22 अशा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर मात्र प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा यामुळे आरती नागरे व शितल म्हेत्रे यांनी केलेल्या जोरदार चढायांच्या जोरावर मुंबई उपनगर शहराला हातघाईवर आणत एक गुणांनी पाठ टेकण्यास भाग पाडले. मुंबई उपनगरच्या हरजीत कौर व शुकदा खोत यांनी चांगली लढत दिली तर सृष्टी रासम हिने उत्कृष्ठ पकडी घेतल्या. बीडच्या संघाला प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा व आलेले मानसिक दडपणामुळे त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळण्यात अपयश आले.
कुमार गटात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात पालघर संघाने नाशिकच्या सुवर्ण चढाई करणाऱ्या चढाईपटुची पकड करीत निर्णायक विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. पालघर संघाने नाशिक संघावर 45-44 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला पालघर संघाकडे 23-16 अशी आघाडी होती. पालघरच्या रोहित लोकरेने खोलवर चौफेर चढाया करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सतिश यादवने काही उत्कृष्ट पकडी घेत त्याला चांगली साथ दिली. तर नाशिकच्या आकाश शिंदेने चांगली टक्कर दिली. हा सामना निर्धारित वेळेत 39-39 गुणांवर संपवला. त्यानंतर हा सामना पाच पाच चढायांमध्ये खेळला गेला. यातही दोन्ही संघानी उत्कृष्ठ खेळ करीत सामना 44-44 गुणांवर संपविला.
त्यानंतर सामनाधिकारी माल्कम रेड्डी यांनी नियमानुसार नाणेफेक घेतली व यामध्ये सुवर्ण चढाई करण्याची संधी नाशिकच्या संघाला मिळाली. नाशिकच्या आकाश शिंदेने ही सुवर्ण चढाई केली खरी पण पालघरच्या राहुल सवर व पियुष पाटील यांनी त्याची उत्कृष्ठ पकड घेतली. परिणामी सुवर्ण चढाईचा गुण पालघरला मिळाल्याने हा सामना पालघरने एक गुणांनी जिंकला.
दुसऱ्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात ठाणे संघाने गतवर्षीच्या विजयी पुणे संघावर 35-22 अशी सहज मात करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यंतराला ठाणे संघाकडे 16-9 अशी आघाडी होती. ठाण्याच्या गोकुळ पाटील व पंकजकुमार सिंग यांनी उक्तृष्ट चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला गौरव पाटीलने चांगल्या पकडी घेत उत्तम साथ दिली. पुण्याच्या हर्षल ढगे याने चांगला प्रतिकार केला. तर प्रथमेश निघोट याने उत्कृष्ट पकडी घेतल्या.
तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने मुंबईशहर संघावर 26-23 असा निसटता विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला कोल्हापूर संघाकडे 13-9 अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या तेजल पाटील याने खोलवर केलेल्या चढाया व ऋतिक पाटिलने घेतलेल्या पकडींमुळे त्यांना विजय मिळविता आला. मुंबईशहर संघाच्या सिध्देश पिंगळेने उत्तम खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तर हर्ष लाडने देखील काही चांगल्या पकडी घेतल्या. परंतू त्यांना कोल्हापूरचा बचाव भेदता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
रत्नागिरी संघाने यजमान बीड संघाचा 45-15 असा धुव्वा उडवीत सहज विजय मिळविला. मध्यंतराला रत्नागिरी संघाकडे 23-10 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर विवेक जांभळे याने चौफेर हल्ला चढवित आपला आक्रमक खेळ केला. तर ऋषिकेश भोसलेनेही चांगल्या पकडी घेत त्याला मोलाची साथ देत विजयात मोलाचा वाटा उचलला. बीड संघाने घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांची निराशा केली. बीडच्या आदित्य शिंदे याने उत्कृष्ट चढाया केल्या तर सचिन ढवळेने पकडी घेत आपले अस्तित्व दाखवून दिले.
कुमार गटात इतर झालेले सामने-
उपउपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यांचे निकाल-
नाशिक वि.वि. सिधुदुर्ग(35-30),
ठाणे वि.वि. मुंबई उपनगर(49-22),
मुंबईशहर वि.वि.रायगड(49-12),
बीड वि.वि. लातुर(48-25)
कुमारी गटात उपउपांत्य पुर्व फेरीचे झालेले सामन्यांचे निकाल-
पुणे वि.वि. रायगड(42-12),
पालघर वि.वि.सोलापूर(30-24),
मुंबई उपनगर वि.वि.ठाणे(65-20),
अहमदनगर वि.वि.सांगली(23-22).
आज होणारे सामने –
उपांत्य फेरीचे सामने कुमारी गट
पुणे विरुद्ध औरंगाबाद
बीड विरुद्ध कोल्हापूर
उपांत्य फेरीचे सामने कुमार गट
ठाणे विरुद्ध पालघर
रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर