टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणे ही काही लहान गोष्ट नाही आणि कधीही नसेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे मोठ्या स्पर्धात्मक प्रमाणात व्यावसायिक स्तरावरील उच्च गुणवत्तेवर खेळले जाते. 

याव्यतिरिक्त धावा करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा घटक म्हणजे टिकून राहणे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या कौशल्य आणि टिकाव यांच्या मिश्रणाचा योग्य वापर करून उत्तम धावा केल्या आहेत.

आतरराष्ट्रीय धावांमध्ये कसोटी, वनडे व आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांतील धावांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू- 

१०. शिवनारायण चंद्रपॉल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs In International Cricket) करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul) १०व्या क्रमांकावर आहे. त्यांने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५.७२ च्या सरासरीने एकूण २०९८८ धावा केल्या आहेत.

चंद्रपॉलने १६४कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ११८६७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर विंडीज संघाकडून त्याने २६८ वनडे सामन्यांमध्ये ८७७८ धावा केल्या आहेत. तर २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावाही त्याने केल्या आहेत.

९. सनथ जयसुर्या

श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू सनथ जयसुर्याने (Sanath Jayasuriya) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५८६ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३४.१४ च्या सरासरीने २१०३२ धावा केल्या आहेत.

जयसुर्याने आतापर्यंत ११० कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४०.०७ च्या सरासरीने ६९७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ४४५ वनडे सामन्यांमध्ये त्याने ३२.३६ च्या सरासरीने १३४३० धावा केल्या आहेत. तर ३१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ६२९ धावाही त्याने केल्या आहेत. यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे.

८. विराट कोहली

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. असं म्हटलं जातं की तो फक्त मनोरंजनासाठी विक्रमांचा रतीब लावतो. तसेच तो येत्या काही वर्षात तिन्ही क्रिकेट प्रकारातील विक्रमांमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची शक्यता आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या पहिला १७ खेळाडूंमध्ये विराट हा एकटा सध्या खेळत असलेला खेळाडू आहे.

कोहली सध्या या यादीत ८व्या क्रमांकावर आहे. परंतु त्याचा फॉर्म पाहता तो येत्या काळात या यादीत अव्वल स्थानी येण्याची दाट शक्यता आहे.

विराटची आकडेवारी पाहिली तर, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४१६ सामन्यांमध्ये ५६.१५ च्या सरासरीने २१९०१ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये त्याची सरासरी सर्वोत्तम आहे. त्यामुळे विराट किती चांगल्या पद्धतीने खेळतो हे दिसते.

विराटने ८६ कसोटी सामन्यांमध्ये ५३.६२ च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने २४८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५९.३३ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत.

तसेच त्याने ८२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत.

७. ब्रायन लारा

वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांसह या यादीत ७व्या क्रमांकावर आहे. लाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२३५८ धावा केल्या आहेत. लारा आतापर्यंत क्रिकेट जगातील सर्वोत्तम डावखुरा फलंदाज म्हणून ओळखला जातो.

लाराने आतापर्यंत १३१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ५२.८८ च्या सरासरीने ११९५३ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

त्याने २००४मध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक ४०० धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम आतापर्यंत कोणालाही मोडता आलेला नाही. तसेच हा विक्रम मोडण्याची शक्यताही फारच कमी आहे.

लाराने २९९ वनडे सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याने ४०.४८ च्या सरासरीने १०४०५ धावा केल्या आहेत. यात १९ शतकांचा आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे.

६. राहुल द्रविड

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज राहुल द्रविडने (Rahul Dravid) आपल्या कारकीर्दीत अनन्य साधारण यश मिळविले आहे. त्याला ‘द वॉल’ अर्थात भारताची भींत म्हणूनही ओळखले जाते.

द्रविडची शिस्त आणि खेळाविषयीची त्याची आपुलकीची कोणी कल्पना करू शकत नाही. त्याच्याबद्दल असेही म्हटले जाते की, द्रविडपेक्षा जास्त टिकून खेळणारा दुसरा कोणताच फलंदाज आतापर्यंत पाहिलेला नाही.

द्रविडने आतापर्यंत खेळलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४२०८ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने केल्या आहेत. त्याचबरोबर द्रविडने १६४ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ५२.३१ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या आहेत.

तसेच त्याने ३४४ वनडे सामन्यांमध्ये १०८८९ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये द्रविडने फक्त १ सामना खेळला आहे. यात त्याने ३१ धावा केल्या आहेत.

५. जॅक कॅलिस

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस (Jacques Kallis) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत ५व्या क्रमांकावर विराजमान आहे. कॅलिसने हे स्थान ४९.१० च्या सरासरीने २५५३४ धावा करत पटकाविले आहे.

तो फलंदाजाबरोबरच एक उत्कृष्ट गोलंदाजही आहे. त्यामुळे त्याला अष्टपैलू म्हणून ओळखले जाते.

कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांमध्ये ५५.३७ च्या सरासरीने १३२८९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ३२८ वनडे सामन्यांमध्ये ४४.३६च्या सरासरीने ११५७९ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतकांचा आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. कॅलिसने आपल्या २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ६६६ धावा केल्या आहेत.

४. माहेला जयवर्धने

माहेला जयवर्धने (Mahela Jayawaradene) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील श्रीलंकेचा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६५२ सामन्यांमध्ये ३९.१५ च्या सरासरीने २५९५७ धावा केल्या आहेत.

जयवर्धनेने १४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४९.८४ च्या सरासरीने ११८१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४४८ वनडे सामन्यांमध्ये १२६५० धावा केल्या आहेत. तर ५५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १ शतक तसेच ९ अर्धशतकाच्या मदतीने १४९३ धावा केल्या आहेत.

३. रिकी पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा वरच्या फळीतील दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५६० सामन्यांत ४५.९५ च्या सरासरीने केलेल्या २७४८३ धावांसह ३ ऱ्या क्रमांकावर आहे. एक दिग्गज फलंदाजाव्यतिरिक्त पाँटिंग हा एक उत्कृष्ट कर्णधारही आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला दोन (२००३, २००७) विश्वचषक मिळवून दिले आहेत.

पाँटिंगने आतापर्यंत १६८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५१.८५ च्या सरासरीने २२७८२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ३७५ वनडे सामन्यांमध्ये ४२.०३ च्या सरासरीने १३७०४ धावांचा आकडाही पूर्ण केला आहे. तसेच पाँटिंगने १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ४०१ धावाही केल्या आहेत.

२. कुमार संगकारा

श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आला आणि गेलाही. परंतु त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली. एक फलंदाजाव्यतिरिक्त त्याला यशस्वी यष्टीरक्षक म्हणूनही ओळखले जाते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये संगकारा सचिननंतर दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण २८०१६ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने केलेल्या धावा या ४६.७७ च्या सरासरीने केलेल्या आहेत.

त्याचबरोबर त्याने १३४ कसोटी सामन्यांमध्ये ५७.४०च्या सरासरीने १२४०० धावा केल्या आहेत. तर ४०४ वनडे सामन्यांमध्ये त्याने १४२३४ धावाही केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ५६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १३८२ धावांचा आकडाही पार केला आहे.

१. सचिन तेंडुलकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.

सचिनचे ४८.५२ च्या सरासरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या ३४३५७ धावांमुळे तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये जन्मलेल्या सचिनने २०० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ४६३ वनडे सामन्यांमध्ये त्याने ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त सचिनने केवळ १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. यामध्ये त्याने केवळ १० धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय

या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय

टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !

You might also like