भारतीय संघ येत्या जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने गुरुवारी (१० जून) या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यासोबतच रवी शास्त्री यांच्या अनुपस्थित राहुल द्रविड हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.
तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) राहुल द्रविडसोबत कार्यरत असणारे सहकारी श्रीलंका दौऱ्यावर सपोर्ट स्टाफची भूमिका पार पाडणार आहेत. परंतु खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापुर्वी कोरोनाच्या दोन लस टोचून घेणे अनिवार्य असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना १३ जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक आठवडा सराव करण्याची संधी मिळू शकते. तत्पुर्वी दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंसाठी बेंगलोरमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता हे आयोजन रद्द करण्यात आले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय खेळाडूंना श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच आवश्यकता भासल्यास श्रीलंकेत जाऊन देखील त्यांना विलगिकरणात राहावे लागू शकते. मंगळवारी श्रीलंकेच्या स्वास्थ मंत्र्यांनी दिलेल्या नियमावलीत म्हटले आहे की, ‘दक्षिण अमेरिका, वियतनम, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशातून येणाऱ्या नागरिकांनी जर कोरोनाचे दोन डोस घेतले असतील; तर त्यांना एकच दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. परंतु हा नियम ३० जूनपर्यंत लागू असणार आहे. त्यानंतर या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे.’
भारतीय संघातील खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखवणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर श्रीलंकेत जाऊन देखील त्यांचा अहवाल निगेटिव्ह येणे गरजेचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट नव्हे ‘हे’ फलंदाज कव्हर ड्राइव्हचे मास्टर, कर्णधार आझमने सांगितली नावे
अथियाच्या इंस्टाग्राम पोस्टने चर्चेला उधान; नेटकरी म्हणाले, ‘राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहेस?’