भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) नेतृत्वाखाली 2 आयसीसी ट्राॅफी जिंकल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत रोहित शर्माचा समावेश आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2023च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर 2024चा टी20 विश्वचषक आणि 2025ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आता रोहितबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रोहितच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियममध्ये एक खास स्टँड बांधले जाईल. हे रोहितच्या नावावर असेल.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहितच्या नावाने वानखेडेवर एक स्टँड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, एमसीएनेही याला मान्यता दिली आहे. रोहितचा सन्मान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
MCA president Ajinkya Naik announcing the Stand for Indian Captain Rohit Sharma at Wankhede stadium 🏟️🇮🇳 pic.twitter.com/vD5XAAKihR
— Johns. (@CricCrazyJohns) April 15, 2025
वानखेडे स्टेडियमवरील स्टँडना सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांची नावे आधीच देण्यात आली आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या नावावर एक स्टँड आहे. ईडन गार्डन्समध्ये सौरव गांगुलीच्या नावावर एक स्टँड देखील आहे. बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये राहुल द्रविडच्या नावावर एक स्टँड आहे. आता या यादीत रोहितचे नावही जोडले गेले आहे.
रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय कारकिर्द-
कसोटी क्रिकेट- रोहित शर्माने 52 कसोटी सामन्यांमध्ये 3,677 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याची सरासरी 46.54 आहे. या फाॅरमॅटमध्ये त्याने 10 शतकं आणि 16 अर्धशतकं केली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 धावा आहे.
वनडे क्रिकेट- रोहित शर्माने 262 वनडे सामन्यांमध्ये 10,709 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याची सरासरी 49.13 आहे. त्याने 31 शतकं आणि 55 अर्धशतकं केली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 धावा आहे, जो वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विक्रम आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट- रोहित शर्माने 148 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,853 धावा केल्या आहेत, दरम्यान त्याची सरासरी 31.32 आहे. त्याने 5 शतकं आणि 29 अर्धशतकं केली आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 धावा आहे.