भारतीय क्रिकेटची देशांतर्गत क्रिकेट प्रणाली इतकी मोठी आहे की, जवळपास ९०० सामने पूर्ण मोसमात खेळले जातात. २७ क्रिकेट संघटना बीसीसीआयशी संलग्न असल्याने खेळाडू देखील मोठ्या प्रमाणात आहेत. जवळपास २००० हून अधिक खेळाडू या संघटनांशी करारबद्ध आहेत.
देशासाठी अंतिम १५ मध्ये स्थान मिळण्यासाठी कशा प्रकारची स्पर्धा असेल याचा अंदाज या आकड्यांवरून येतो.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महारथी असलेले अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय संघासाठी खेळू शकले नाहीत अथवा एकदम कमी संध्या त्यांना मिळाल्या. अमोल मुजुमदार, रजत भाटिया, मिथुन मन्हास, धीरज जाधव, जलज सक्सेना ही अशी काही नावे आहेत. यापैकी महाराष्ट्राच्या धीरज जाधव याचे विषयी आपण जरा जाणून घेऊया.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जन्मलेला धीरज वडिलांच्या नोकरीमुळे लहानपणी मुंबईत राहिला. मुंबईतच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. डाव्या हाताने शैलीदार फलंदाजी करत असल्याने त्याचा खेळ पाहणाऱ्यांना खूप आवडत असे. चौदा वर्षाखालील मुलांच्या वयोगटात धीरज मुंबईचे प्रतिनिधित्व करत असे.
अशातच एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. त्यानंतर, ते राहत असलेल्या चेंबूर भागात बाबरी मस्जिद विध्वंसानंतर उसळलेल्या दंगली त्याने अनुभवल्या. याच दरम्यान त्याची, मुंबईच्या १६ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली. परंतु, त्याच्या आईने भविष्याचा विचार करून मुंबई सोडण्याचे ठरविले. मुंबईपेक्षा सुरक्षित असलेल्या पुण्यामध्ये येऊन ते राहू लागले. सोबत नातेवाईक देखील असल्याने त्यांना आधारही होता.
पुण्यामध्ये आल्यावरही धीरजने क्रिकेट बंद केले नाही. तो स्थानिक संघांसाठी क्रिकेट खेळू लागला. मुंबईप्रमाणेच पुण्यातील क्रिकेट वर्तुळात देखील त्याने चांगले नाव कमावले. एकोणीस वर्षाखालील संघासाठी जबरदस्त कामगिरी करत त्याने महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दार ठोठावले. १९९९ सालच्या रणजी मोसमात त्याने महाराष्ट्रासाठी पदार्पण केले.
वयोगट स्पर्धांमधून नाव कमावल्यानंतर रणजीमध्येदेखील धीरजने आपली देखणी कामगिरी सुरू केली ठेवली. महाराष्ट्रासाठी सलगपणे दर्जेदार खेळ्या खेळल्याने भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे नाव गाजू लागले.
१९९९-२००४ या काळात धीरजने ५२ प्रथमश्रेणी सामन्यात ५२ च्या सरासरीने धावा बनवल्या. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या २६० होती. २००४ मध्ये भारत अ साठी खेळताना भारताच्या वरिष्ठ संघाविरुद्ध शतकी खेळी केली. त्याचे बक्षीस म्हणून धीरजला, त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबई येथे झालेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघात सलामीवीर म्हणून निवड झाली.
सचिन, द्रविड, गांगुली, लक्ष्मण यासारख्या दिग्गजांच्या सोबत तो ड्रेसिंग रूम शेअर करत होता. सराव करत होता. दुर्दैवाने त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नाही. भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमपर्यंत जाऊन आल्यानंतरही, तो धावा बनवत राहिला. मात्र, यानंतर, पुढे कधीच त्याची भारतीय संघासाठी निवड झाली नाही.
२००६-२००७ पर्यंत आठ वर्ष महाराष्ट्र संघाकडून खेळल्यानंतर, त्याने आसाम रणजी संघासाठी खेळण्याचे ठरवले. त्याचवेळी, इंडियन क्रिकेट लीग या बंडखोर स्पर्धेच्या मुंबई चॅम्प्स या संघातदेखील तो खेळला. आयसीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर धीरजने इंग्लंडचा मार्ग धरला.
हावरीच आरएमआय क्रिकेट क्लब या संघासोबत २००८-२०१० असा तीन वर्षांचा करार त्याने केला. हावरीचसाठी पहिलाच मोसम गाजवत त्याने अवघ्या १५ डावात ८५ च्या अविश्वसनीय सरासरीने ९३९ धावा बनविल्या.त्याची हावरीचसाठी एका डावात सर्वाधिक धावांचा ( १६४) विक्रम देखील केला.
इंग्लंडहून परतल्यानंतर, २०११ च्या आयपीएलमध्ये, नव्याने दाखल झालेल्या पुणे वॉरियर्स इंडिया या संघाने त्याला, खरेदी करत आपल्या ताफ्यात सामील केले. दुर्दैवाने, तो आयपीएलमध्ये देखील पदार्पण करू शकला नाही.
आसामसाठी तो सलगपणे रणजीत खेळत राहिला. आसाममध्ये क्रिकेटचा प्रसार व प्रसिद्धी करण्यात धीरजचे योगदान खूप मोठे आहे. धीरजने १११ प्रथमश्रेणी सामन्यात ७,६७९ धावा करताना ५०.८५ ची जबरदस्त सरासरी राखली.
क्रिकइंफो वेबसाईटनुसार धिरज शेवटचा प्रथम श्रेणी सामना २३ ते २६ नोव्हेंबर २०१५ रोजी गोवा संघाकडून खेळला. परंतू त्याला दोन्ही डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. सध्या धीरज पुणे आणि बारामती येथे आपली क्रिकेट अकादमी चालवतो. तसेच, मेघालय रणजी संघाचा तो मुख्य प्रशिक्षक आहे.
राष्ट्रीय संघात निवड होऊनही, अफाट प्रतिभा असून, देशांतर्गत क्रिकेटच्या दिग्गज बनून ही, धीरजचे देशासाठी खेळायचे राहून गेले ते कायमचेच !
वाचा- युवराजपेक्षा सरस असलेला महाराष्ट्राचा अभिजीत काळे भारतासाठी खेळला फक्त एक सामना