बरोबर १३ वर्षांपूर्वी १९ सप्टेंबर रोजी भारताच्या अष्टपैलू युवराज सिंहने अवघे क्रिकेटजगत आपल्या पायाशी आणले होते. त्या दिवसापासून जहा तहा फक्त युवराजचीच चर्चा होती. १९ सप्टेंबर २००७ ला युवराज टी२० मध्ये एका षटकात सहा षटकार ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. युवराजने इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध पहिल्या टी२० विश्वचषकातील साखळी सामन्यात, डर्बनच्या किंग्समीड मैदानावर क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो अवघा दुसरा फलंदाज ठरला. सामन्यातील व विश्वचषकातील भारताच्या स्थितीमुळे युवराजची ती खेळी अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरली. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला तो सामना जिंकणे अनिवार्य होते आणि भारताला उपांत्य फेरीत नेण्याचे शिवधनुष्य युवराजने पेलले.
भारतीय कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनी इंग्लंडच्या अनुनभवी गोलंदाजीची पिसे काढत १४ षटकात १३६ धावांची जबरदस्त सुरुवात दिली. चांगल्या सुरुवातीनंतर वीस धावांच्या अंतरात गंभीर, सेहवाग व रॉबिन उथप्पा तंबूत परतले. डावातील अजून २० चेंडू टाकले जाणे शिल्लक होते. भारतातर्फे फिनिशर म्हणून युवराज सिंह व कर्णधार धोनी मैदानावर उभे होते.
अठरावे षटक टाकण्यासाठी आलेल्या दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफला युवराजने दोन चौकार मारले. त्यामुळे फ्लिंटॉफ काहीसा नाराज झाला व बडबडू लागला. खऱ्या नाट्याला ते षटक संपल्यानंतर सुरुवात झाली. षटक संपल्यानंतर, क्षेत्रक्षणासाठी जात असलेला फ्लिंटॉफ पुन्हा एकदा युवराजला काहीतरी बोलला. त्याने शिवी दिल्यामुळे युवराज वैतागला. त्यानेही फ्लिंटॉफला त्याच्याच भाषेत उत्तर देत, बॅट दाखवत धडा शिकवण्याचा इशारा दिला. धोनीने युवराजला शांत करत फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. युवराज फलंदाजीसाठी आला मात्र त्याच्या डोक्यात राग होताच.
आधीच त्रासलेल्या युवराजसमोर १९ वे षटक टाकायला युवा स्टुअर्ट ब्रॉड आला. ब्राॅडने टाकलेला पहिला झेंडू युवराजच्या टप्प्यात आला आणि त्याने लॉंग ऑनला १११ मीटरचा लांबलचक षटकार लगावला. दुसरा पायावर पडलेला चेंडू सहजरीत्या फ्लिक करत युवराजने प्रेक्षकांत पोहोचवला. ब्रॉडने टाकलेला तिसरा वाईड यॉर्कर चेंडू युवराजच्या पट्ट्यात आला आणि लॉंग ऑफला सीमारेषे पार गेला. सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारून युवराजने षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली.
आधीच तीन षटकार खाल्लेल्या ब्रॉडकडून चौथा चेंडू फुलटॉस पडला आणि युवराजने ही संधी दोन्ही हातांनी पकडत, डीप पॉईंटला चौथा षटकार मारला. मैदानावरील सर्व प्रेक्षक आणि संघ सहकारी उभे राहून टाळ्या वाजवत होते. पाचवा चेंडू पुन्हा एकदा पुढ्यात पडला आणि युवराजने तो प्रेक्षकात पाठवायला अजिबात ढिलाई दाखवली नाही. अगदी काही महिन्यांपूर्वीच इंग्लंडच्या दिमित्री मस्करेनसने युवराजला सलग पाच षटकार ठोकले होते. तो बदला युवराजने पूर्ण केला होता.
अखेरचा चेंडू टाकण्यापूर्वी, इंग्लंडचे सर्व अनुभवी खेळाडू ब्रॉडला समजावू लागले. मैदानावरील प्रेक्षकांत सोबत टीव्हीवर सामना पाहणारे असंख्य क्रिकेटचाहते उभे राहून प्रार्थना करत होते की युवराजने सलग सहा षटकार मारावेत. अखेरचा चेंडू टाकण्यासाठी ब्रॉड धावू लागला आणि सर्वांच्या हृदयाची धडधड वाढली. पाच षटकार पडलेले असताना, ब्रॉड आधीच हतबल झाला होता. सहावा चेंडू त्याने जणूकाही युवराजला षटकार मारण्यासाठी भेट दिला आणि युवराजने भेट स्वीकारत लॉंग ऑनला उत्तुंग षटकार ठोकत, एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. पंच सायमन टॉफेल यांनी दोन्ही हात उंचावत षटकाराची पुष्टी केली व सबंध मैदानावर फटाक्यांची आतिषबाजी झाली. याच खेळीने टी२० क्रिकेटचा पहिला सुपरस्टार म्हणून युवराज ला मान्यता मिळाली.
याच दरम्यान, या पंजाबच्या पुत्तरने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. आज तेरा वर्षानंतरही हा विक्रम अबाधित आहे. फ्लिंटॉफने घेतलेल्या पंग्याची जबरदस्त किंमत ब्रॉडला चुकवावी लागली. पुढे, भारताने हा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावे केले.
वाचा-
-पहिलाच सामना जिंकायला धोनी ‘या’ ११ खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात
-आयपीएल २०२०: सर्व ८ संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी
-‘उजव्या हाताचा रिषभ पंत’ अशी ओळख असलेला मोहरा आयपीएल गाजवणार