न्यूझीलंड क्रिकेट संघ.. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात सभ्य समजला जाणारा संघ.. जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींच्या आवडत्या संघांमध्ये, न्यूझीलंडला नक्की स्थान असते.. न्युझीलंडचे खेळाडू आपल्या खेळाने व खेळभावनेने क्रिकेटरसिकांची मने कायमच जिंकत आले आहेत.. त्याच, न्यूझीलंडच्या एका खेळाडूची संपूर्ण दुनिया दिवानी आहे.. जबरदस्त तंदुरुस्ती, चेहऱ्यावरील हास्य, तुफानी फलंदाजी, अत्यंत चपळ क्षेत्ररक्षण व कप्तानी याद्वारे त्या खेळाडूने न्यूझीलंडला २०१५ क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेले होते. तुम्ही ओळखल का, आम्ही आज कोणाविषयी बोलतोय ? आज (27 सप्टेंबर) आपण, आपला ४१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराविषयी म्हणजे ब्रेंडन मॅक्यूलमविषयी बोलतोय.
ड्युनेडीनच्या किंग हायस्कूलच्या मैदानावर ब्रेंडन व त्याचा भाऊ नॅथन क्रिकेटचे धडे गिरवत. त्यांचे वडील स्टुअर्ट हे ओटागोसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत. यष्टीरक्षक असलेला ब्रेंडन अत्यंत आक्रमक फलंदाजी करत. वेगवान गोलंदाज असो नाहीतर फिरकी गोलंदाज सर्वच त्याच्यासमोर गोलंदाजी करायला भित. त्याच्या याच फलंदाजीच्या जोरावर त्याने अवघ्या २१ व्या वर्षी राष्ट्रीय संघात जागा मिळवली.
२००२ मध्ये न्युझीलंड संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामील झालेल्या ब्रेंडनने आपल्या ताबडतोड फलंदाजीने आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांची मने जिंकली. आधी मधल्या फळीत फलंदाजी करत असलेला ब्रेंडन काही वर्षातच सलामीवीर म्हणून फलंदाजीला येऊ लागला. २००५ मध्ये नव्याने सुरू झालेल्या टी२० क्रिकेटचा तर तो बादशाह झाला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००८ मध्ये आयपीएलची सुरुवात केली. अगदी काही महिन्यांपूर्वी पहिला टी२० विश्वचषक संपला होता, ज्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत पहिले टी२० विश्वविजेतेपद मिळवले होते. टी२० काही दिवसातच अफाट लोकप्रिय झाले. याचा फायदा उचलण्यासाठी बीसीसीआयने आयपीएलचा घाट घातला. आयपीएलला कसा प्रतिसाद मिळेल ? लोक मैदानावर येतील का ? असे अनेक प्रश्न बीसीसीआयसमोर होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे पहिल्याच सामन्यात मिळाली आणि उत्तर देणारा होता ब्रेंडन मॅक्यूलम.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमने-सामने होते. आरसीबीचा कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकत, केकेआरला पहिली फलंदाजी दिली आणि घात झाला. ब्रेंडन मॅक्यूलमने इतक्या निर्दयतेने आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली की सांगायलाच नको ! अवघ्या ७८ चेंडूत त्याने १५८ धावा ठोकल्या. ज्यात १० सणसणीत चौकार व १३ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. मॅक्यूलमच्या या एका खेळीने खऱ्या अर्थाने आयपीएलला ओळख दिली. आजही आयपीएलमधील सर्वोत्तम खेळीसाठीचा सर्वे घेतला गेला तर त्यात , मॅक्यूलमची ही स्फोटक खेळी अव्वल क्रमांकावर येते. आयपीएलमधील पाच संघांसाठी तसेच इतर व्यवसायिक टी२० लीग स्पर्धांत विविध संघांसाठी तो पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, वेस्टइंडीज या देशांत तो खेळला. टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे ९,००० धावा जमा आहेत. अशी कामगिरी करणारा तो, ख्रिस गेल नंतर अवघा दुसरा फलंदाज ठरला.
ज्याप्रमाणे मॅक्यूलमने टी२० क्रिकेट गाजवले, त्याचप्रमाणे वनडे व कसोटी क्रिकेटचा देखील तो अप्रतिम खेळाडू होता. १०१ कसोटी सामन्यांमधून त्याने १२ शतकांसह ६,४०० धावा जमवल्या. कसोटी क्रिकेटमध्ये मॅक्यूलमने आपले कसब दाखवत न्युझीलंडसाठी सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत ८०० तर इंग्लंड विरुद्ध १,०४० धावा काढल्या. भारताविरुद्ध त्याच्या फलंदाजीला वेगळा बहर येत. भारताविरुद्ध केवळ दहा कसोटींमध्ये त्याने १२०० हून अधिक धावा ठोकल्या आहेत. पाकिस्तान विरुद्ध देखील त्याची सरासरी ४९ इतकी लाजवाब होती.
२०१६ मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर असताना, त्याने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळताना त्याने, अवघ्या ५४ चेंडूत शतक साजरे केले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक झळकावण्याचा विश्वविक्रम त्याने अखेरच्या कसोटीत केला. ही खेळी पुढे नेत त्याने ७९ चेंडूत १४५ धावा झोडल्या.
ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे झालेला २०१५ चा विश्वचषक खऱ्या अर्थाने मॅक्यूलमच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण म्हणता येईल. आपल्या कल्पक नेतृत्वाने त्याने न्यूझीलंडला प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत नेले. संपूर्ण स्पर्धेत आपल्या ताबडतोड फलंदाजीने त्याने सर्व संघांच्या नाकात दम केला. मॅक्यूलम-गुप्टिल ही न्यूझीलंडची सलामीवीर जोडी अर्धा सामना आधीच जिंकून देत होती. मॅक्यूलमने स्पर्धेत ६ अर्धशतके झळकावत, संघाच्या फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता.
मॅक्यूलमने आपल्या कारकिर्दीत न्युझीलंड क्रिकेटसाठी अनेक दर्जेदार क्रिकेटपटू शोधण्याचे काम केले. या खेळाडूंना पुरेशा संधी देत, तो त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असत. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, नील वॅग्नर, मिचेल सॅन्टनर या गोलंदाजांवर त्याने कायम विश्वास ठेवत, स्वातंत्र्य दिले. केन विल्यमसन, टॉम लॅथम व बीजे वॉटलिंग या होतकरू खेळाडूंची पारख करण्याचे श्रेयदेखील मॅक्यूलमला जाते.
मॅक्यूलमने आपल्या देशासाठी सर्वप्रथम १०१ कसोटी खेळण्याचा पराक्रम केला. या १०१ कसोटीत त्याने, ६,४५३ धावा काढल्या. यात १२ शेतक यांचा देखील समावेश होता. २०१४ मध्ये भारताविरुद्ध झळकावलेले, ऐतिहासिक त्रिशतक त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. २६० वनडेमध्ये ६,०८३ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. ७१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना त्याने, दोन हजाराहून अधिक धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकणारा तो दुसरा खेळाडू होता.
निवृत्तीनंतर मॅक्यूलमने समालोचनाकडे आपला मोर्चा वळवला. स्टार स्पोर्टसाठी आयपीएल व काही द्विपक्षीय मालिकांमध्ये त्याने समालोचन केले. २०१९ क्रिकेट विश्र्वचषकावेळी तो आयसीसीचा अधिकृत समालोचक होता. २०२० आयपीएल लिलावानंतर, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. याचसोबत तो, कॅरेबियन प्रीमियर लीगमधील त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचा देखील प्रशिक्षक बनला. त्रिनबॅगो नाईट रायडर्सला सीपीएल २०२० चे विजेतेपद मिळवून देत, त्याने आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीची सुरुवात झोकात केली.
मॅक्यूलम सध्या इंग्लंड कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. ज्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यासोबत मिळून घरच्या मैदानावर सलग विजयाचा धडाका लावला आहे.
मॅक्यूलमच्या समकालीन अनेक आक्रमक फलंदाज होते. ज्यात, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स या दिग्गजांचा समावेश होत होता. मात्र, या सर्वांमध्ये आपले वेगळेपण जपत मॅक्यूलमने आपली १४ वर्षाची दैदिप्यमान कारकीर्द गाजवली.
वाचा- मुंबईने टीम इंडियाला दिलेला ‘हा’ अवलिया फलंदाज, ज्याने तब्बल ५ रणजी संघाचं केलं होतं प्रतिनिधित्व