---Advertisement---

‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली

On: रविवार, जानेवारी 30, 2022 11:30 AM
VIRENDER-SEHWAG
---Advertisement---

कोणत्याही खेळात विशिष्ट संघांची जुगलबंदी ही त्या खेळासाठी व चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. फुटबॉलमध्ये ज्याप्रकारे रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना हा सामना ‘एल क्लासिको’ म्हणून ओळखला जातो. तसेच, क्रिकेटमध्ये ऍशेज मालिका व भारत-पाकिस्तान या दरम्यानच्या सामन्यावेळी खेळाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. २००१ पासून भारत-पाकिस्तान व्यतिरिक्त भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर नवीन द्वंद सुरू झाले. ऑस्ट्रेलियाच्या सलग १६ कसोटी विजयांचा विजयरथ भारताने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर रोखला होता. तेव्हापासून दोन्ही संघांतील खेळाडू मैदानावर एकदम त्वेषाने खेळू लागले. क्रिकेटच्या मैदानावरील याच नव्या ‘दुश्मनी’ चा दुसरा अध्याय २००४-२००५ च्या भारत दौऱ्यावर लिहिला गेला. यावेळी, या अध्यायातील दोन महत्त्वाची पात्रे होती वीरेंद्र सेहवाग आणि शेन वॉर्न.

मागील दौऱ्यातील पराभवाचा बदला घेण्यासाठी, ऑस्ट्रेलिया होता सज्ज

तीन वर्षापूर्वीच्या दौऱ्यात मात खाल्ल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळण्यासाठी पुन्हा एकदा भारत भूमीवर उतरला. संघाचा नियमित कर्णधार रिकी पॉंटिंग दुखापतीमुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. त्याच्या जागी कर्णधारपदाची माळ ॲडम गिलख्रिस्टच्या गळ्यात टाकण्यात आली होती. मालिकेतील पहिली कसोटी बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झाली. पुढे जाऊन, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झालेल्या मायकल क्लार्कने या सामन्यात पदार्पण करत दमदार दीडशतक बनवले. गिलख्रिस्टने सुद्धा आक्रमक शतक झळकावून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४७४ पर्यंत नेली. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २२८ धावा बनवलेल्या. भारताला विजयासाठी मिळालेले ४५६ धावांचे आव्हान पेलवले नाही आणि तो सामना भारताने २१७ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने दौऱ्याची सुरुवात थाटात केली.

चेन्नईच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यातही पहिल्या सामन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. जस्टिन लँगर व मॅथ्यू हेडन यांनी १३६ धावांची दमदार सलामी दिली. मात्र, हरभजनने दोघांना एकाच षटकात बाद करत अचानक धावगतीला ब्रेक लावला. त्यानंतर देखील, कॅटीच आणि डेमियन मार्टीन यांनी थोडाफार डाव सावरला. १८६ वर २ अशी, समाधानकारक धावसंख्या असताना, अनिल कुंबळेने आपल्या फिरकीचे जाळे टाकले. कुंबळेने ४८ धावा देऊन सलग ७ ऑस्ट्रेलियन फलंदाज तंबूत पाठवले. मोठ्या धावसंख्येचे दिशेने आगेकूच करत असलेला, ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांवर संपुष्टात आला.

पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीमुळे आकाश चोप्राला या सामन्यासाठी वगळण्यात आले होते. तर, भरवशाचा सचिन तेंडुलकर दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. संघ व्यवस्थापनाने, या दोघांच्या जागी युवा मोहम्मद कैफ व युवराज सिंह यांना संघात स्थान दिले. याच युवराजला सेहवागसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवण्यात आले. प्रथमच सलामीला आलेल्या युवराजच्या बॅटची कड घेऊन चेंडू दुसऱ्या स्लीपमध्ये गेला. मात्र, क्षेत्ररक्षकाला तो झेल पकडता आला नाही. सेहवागने मॅकग्राला दोन चौकार मारत आत्मविश्वासाने सुरुवात केली. गिलख्रिस्टने आपल्या कप्तानीची चुणूक दाखवत, शेन वॉर्नला अकराव्या षटकातच गोलंदाजीसाठी आणले. वॉर्नने, कर्णधाराने टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. चाचपडत खेळत असणाऱ्या, युवराजला त्याने गिलख्रिस्टकरवीच झेलबाद केले. युवराजला बाद करताच वॉर्नने, मुरलीधरनच्या ५३२ कसोटी बळींची बरोबरी केली. हे दिवसातील अखेरचे षटक असल्याने, भारताचा ‘नाईट वॉचमन’ म्हणून इरफान पठाण मैदानात आला. त्याने उर्वरित चेंडू खेळून काढत दिवसाचा खेळ संपवला. भारताची धावसंख्या पहिल्या दिवसाखेर, २८-१ अशी होती. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही २०७ धावांची आघाडी होती.

सेहवाग विरुद्ध वॉर्न

दुसऱ्या दिवशी, सेहवाग-इरफानने मॅकग्रा आणि जेसन गिलेस्पीविरूद्ध सावधगिरीने सुरुवात केली. वॉर्न गोलंदाजीला आला तेव्हा, इरफानने त्याला षटकार ठोकला. सेहवाग सुरुवातीपासूनच आपल्या शैलीच्या विपरीत खेळत होता. त्याने ७८ चेंडूत ३१ धावा केलेल्या. भारताने २६ षटकांत अवघ्या ४८ धावा काढल्या होत्या. मात्र, बळी देखील एकच गमावला होता.

बळी मिळवण्यासाठी, गिलख्रिस्ट उपाय शोधत होता. मॅकग्रा गोलंदाजीला आला आणि सेहवागचे रूप बदलले. त्याने मॅकग्राला आधी कव्हर्स आणि नंतर मिड विकेटला असे दोन चौकार ठोकले. वॉर्न गोलंदाजीला आला तेव्हा, सेहवागने गुडघ्यावर बसून त्याला फटके मारले. वॉर्न विरुद्ध आक्रमणाचे धोरण सचिनने १९९७-९८ मध्ये अवलंबिलेले. काहीशा याच प्रकारे सेहवागदेखील फलंदाजी करत होता. सेहवागने त्याला पुढे सरसावत एक षटकार देखील मारला.

दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत असताना चांगली भागीदारी बनवत होते. धावा गेल्या असतानाही, वॉर्न मात्र हताश झाला नाही. त्याने इरफानला हेडनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. इरफानने सेहवागसोबत बहुमूल्य ५५ धावा जोडल्या. इरफानला बाद करताच, वॉर्न सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या कसोटी गोलंदाजांच्या यादीत शीर्षस्थानी पोचला. इरफानच्या जागी आलेल्या राहुल द्रविडने आपल्या बचावात्मक खेळाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्रास करायला सुरुवात केली.

वॉर्नच्या चेंडूने एक-दोन वेळा सेहवागच्या बॅटची कड घेतली. वॉर्न वारंवार सेहवागला चकवत होता. मात्र, सेहवागने यातून सावरत, पॅडल स्लीपचे चौकार वसूल केले. अखेरीस, मॅकग्राचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये चौकारासाठी ढकलत, त्याने १४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारताच्या १६० पैकी १०३ धावा सेहवागच्या होत्या. सेहवागच्या शतकानंतर द्रविड लवकरच बाद झाला.

द्रविड बाद झाला पण, सेहवागला रोखायचे कसे? हा प्रश्न गिलख्रिस्टसमोर होता. त्याने डॅरेन लेहमनला गोलंदाजीसाठी आणले. सेहवागने त्याला तीन सणसणीत चौकार मारत, ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या रणनीतीवर मात केली. अनुभवी गांगुली व लक्ष्मण एक आकडी धावसंख्येच्या पुढे जाऊ शकले नाहीत. लक्ष्मण बाद झाला तेव्हा, भारत २२ धावांनी पिछाडीवर होता. भारताचे दोन प्रमुख फलंदाज बाद केल्याने, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा मुख्यत्वे वॉर्नचा आत्मविश्वास वाढला. तो सेहवाग आणि कैफ यांना फसवत राहिला. सेहवागच्या आक्रमणाला देखील त्याने वेसन घातली. इतक्यात, कैफचा एक झेल स्लिपमधील मॅथ्यू हेडनच्या हातून सुटला.

वेगवान गोलंदाज गोलंदाजीला आल्यानंतर, सेहवागने पुन्हा आपले हात खोलले. कॅस्प्रोविचला त्याने काही उत्कृष्ट फटके खेळले. पाठोपाठ, वॉर्नला हवेतून फटका मारण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने हवेत चेंडू मारला, सुदैवाने मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तो झेल पकडू शकला नाही. वॉर्न व ऑस्ट्रेलियन संघ खूप निराश झाला. त्यानंतर सेहवागने वॉर्नला उत्तुंग षटकार ठोकला.

शेवटचे हसू वॉर्नचे..

सेहवागने दीड शतकाची वेस ओलांडली होती. सेहवागचा अवतार पाहता तो, मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. वॉर्न व सेहवाग यांच्यातील मुकाबला रोमांचक होत चालला होता. अखेरीस, वॉर्नच्या एका हळुवार चेंडूवर सेहवाग फसला. अचानकपणे उसळलेल्या त्या चेंडूवर सेहवागने जोरदार प्रहार केला. मात्र ,चेंडू हवेत उडाला. डीप मिड क्रिकेटचा क्षेत्ररक्षक असलेल्या क्लार्कने पुढे धावत येत, सूर मारून तो अवघड झेल पकडला. सेहवागची खेळी १५५ धावांवर मर्यादित राहिली. दोन उच्चकोटीच्या खेळाडूंमधील हे द्वंद वॉर्नने आपल्या नावे केले.

सामना राहिला अनिर्णित

सेहवाग बाद झाल्यानंतर कैफ व पार्थिव पटेल यांनी अर्धशतके करत, भारताला १४१ धावांची आघाडी मिळवून दिली. वॉर्नने १२५ धावा देत ६ बळी मिळवले. वॉर्नचे भारतभूमीवरील हे पहिले आणि अखेरचे पंचक ठरले. डेमियन मार्टिनच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३६९ धावा बनवल्या. भारताला विजयासाठी २२९ धावांची गरज होती. भारताने बिनबाद १९ अशी सुरुवात केली असतानाच, पाऊस सुरु झाला तो पुन्हा उघडलाच नाही. सामना अनिर्णित राहिला.

ऑस्ट्रेलियाने मागील हिशोब चुकता केला

चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेऊन नागपूरला गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर तब्बल ३४२ धावांनी नागपूर कसोटी जिंकली. मालिकेतील अखेरची, अटीतटीची झालेली मुंबई कसोटी जिंकत भारतीय संघाने नामुष्कीजनक पराभव वाचवला. याच मालिकेतून, भारताला गौतम गंभीर तर ऑस्ट्रेलियाला मायकल क्लार्क यांच्यासारखे अव्वल दर्जाचे क्रिकेटपटू मिळाले.

भारत-ऑस्ट्रेलिया त्यांच्यात आत्तापर्यंत ज्या काही उत्कृष्ट मालिका झाल्या त्यातील ही मालिका, वॉर्न-सेहवाग यांच्या जुगलबंदीसाठी कायम लक्षात राहते.

वाचा- गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---