पुणे : पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित तिसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत खुल्या गटात अंतिम फेरीत टस्कर्स संघाने ग्लॅडिएटर्स संघाचा टायब्रेकरमध्ये 2-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या अंतिम लढतीत दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 12व्या मिनिटाला जेहान कोठारीने दिलेल्या पासवर मनन जोशीने गोल करून टस्कर्स संघाचे खाते उघडले. त्यानंतर ग्लॅडिएटर्सच्या आघाडीच्या फळीने बरोबरी साधण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण टस्कर्स संघाने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. पूर्वार्धात हि आघाडी कायम होती.
उत्तरार्धात, मात्र 25व्या मिनिटाला ग्लॅडिएटर्सच्या विक्रम भावेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये टस्कर्सकडून जेहान कोठारीने गोल केला. तर ग्लॅडिएटर्सकडून प्रभांश मथरू, सिद्धार्थ भोळे, क्रिश कासट यांना गोल मारण्यात अपयश आले.
स्पर्धेतील विजेत्या टस्कर्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर आणि रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: अंतिम फेरी: खुला गट:
टस्कर्स: 1(मनन जोशी 12मि.) वि.ग्लॅडिएटर्स: 1(विक्रम भावे 25मि.);
टस्कर्स: 1(जेहान कोठारी,(गोल चुकविला – सिद्धांत पवार, दर्शन कांकरिया) टायब्रेकरमध्ये वि.वि.ग्लॅडिएटर्स: 0(गोल चुकविला – प्रभांश मथरू, सिद्धार्थ भोळे, क्रिश कासट); पूर्ण वेळ: 1-1.
इतर पारितोषिके
बेस्ट डिफेंडर: दर्शन कांकरिया
मोस्ट असिस्ट: तनिश दादलानी
गोल्डन ग्लोव्ह: सिद्धांत पवार
गोल्डन बूट: यश भिडे
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट: जेहान कोठारी.