ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथ हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात अडकत असतो. वास्तवात स्मिथची प्रतिमा ही जगातील काही चांगल्या खेळाडूंमध्ये येते मात्र काहीवेळा स्मिथच्या काही कृतींमधून मोठे वाद निर्माण होतात. आपण या लेखात बघणार आहोत स्मिथ संदर्भात घडलेले टॉप 3 विवाद
1) रिव्ह्यू घेताना ड्रेसिंग रूमकडे बघणे –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 2017 साली भारतात बॉर्डर – गावसकर मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाद झाल्यानंतर स्मिथने रिव्ह्यू घेण्याबाबत पवेलियनमधील सहकाऱ्यांकडे विचारणा केली. ही बाब अंपायरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशी कृती करणे क्रिकेटच्या नियमांविरुद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. सामना संपल्यानंतर स्मिथने आपले ब्रेन फेड झाले होते, असे सांगत माफी देखील मागितली होती.
2) चेंडू छेडछाड विवाद –
सन 2018 साली दक्षिण आफ्रिकेत घडलेल्या चेंडू छेडछाडबाबत जगातील जवळजवळ प्रत्येक क्रिकेट रसिकाला माहिती असेल. आफ्रिका दौऱ्यात केपटाऊन येथे कसोटी सामना खेळत असताना ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून बॅनक्रॉफ्टने चेंडू सोबत छेडछाड केली होती. हे दृश्य कॅमेराने टिपल्यानंतर हळूहळू बाबी पुढे आल्या की, कर्णधार स्टीव स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनीच बॅनक्रॉफ्टला असे कृत्य करण्यास प्रवृत्त केले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने या प्रसंगावर प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत स्मिथ आणि वॉर्नरला प्रत्येकी 12 महिन्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले होते.
3) खेळपट्टीवरील लाईन पुसताना वायरल झालेला व्हिडिओ –
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे झालेला तिसरा कसोटी सामना भारतीय क्रिकेट संघाच्या अभूतपूर्व कामगिरी सोबतच स्मिथच्या एका व्हिडिओमुळे देखील कायम स्मरणात राहणार आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ सामना अनिर्णित राखण्यासाठी लढाई करत असतानाच, स्मिथने ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर जाऊन रिषभ पंतने केलेले मार्क पुसल्याचे दिसत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. व्हिडिओ वायरल झाल्यानंतर सर्व बाजूने स्मिथवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. पण असे असले तरी त्याबाबत कोणीही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेनने हे स्पष्ट केले की स्मिथचा खेळपट्टीशी छेडछाड करण्याचा कोणताही उद्देश नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
कसोटी इतिहासातील अविस्मरणीय राहिलेले भारताचे ५ अनिर्णित सामने
सईद मुश्ताक अली ट्रॉफी : सुरेश रैनाची खराब कामगिरी; सलग दुसर्या सामन्यात उत्तरप्रदेशचा पराभव