जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असले तरी, अनेक विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेण्याचे सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत आयपीएलचा पूर्वार्ध व उत्तरार्ध मिळून तब्बल १५ परदेशी खेळाडूंनी विविध कारणांनी माघार घेतली असून, आज आपण त्याच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत.
राजस्थान रॉयल्स-
आयपीएलच्या पूर्वार्धात सर्वप्रथम माघार घेणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा ऍण्ड्रू टाय होता. त्याने बायो-बबलचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याशिवाय, इंग्लंडचा सर्वोत्तम अष्टपैलू बेन स्टोक्स स्पर्धेच्या पूर्वार्धात दुखापतीमुळे केवळ एक सामना खेळून बाहेर पडला होता. त्यानंतर आता मानसिक स्वास्थ्याचे कारण देत तो उर्वरित आयपीएल खेळणार नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे स्पर्धेच्या पहिल्या भागात ही सहभागी झाला नव्हता. तसेच, आता इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याने कुटुंबाला वेळ देण्यासाठी स्पर्धेच्या उर्वरित भागातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्स-
पंजाब किंग्सने आयपीएल लिलावात मोठ्या रकमेत विकत घेतलेले झाय रिचर्डसन व रायली मेरेडिथ यांनी आपण आयपीएल २०२१ उर्वरित हंगामासाठी उपलब्ध नसेल असे कळवले होते. त्याचबरोबर आता नुकताच इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान यानेही आपण आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-
भारतीय कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आयसीसी) संघातील सर्वाधिक पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झंपा व वेगवान केन रिचर्डसन हे आयपीएलचा पूर्वार्ध सुरू असतानाच बायो-बबलचे कारण देत स्पर्धेतून बाहेर गेले होते. त्यानंतर, आता संघातील न्यूझीलंडचा युवा फलंदाज फिन ऍलन, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल सॅम्स व यष्टीरक्षक जोशुआ फिलीप यांनी आपण उर्वरित हंगामासाठी उपलब्ध नसल्याचे फ्रॅंचाईजीला सांगितले आहे.
केकेआर-
कोलकाता नाईट रायडर्सचा प्रमुख ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने टी२० विश्वचषकाच्या तयारीचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे.
सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स-
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू ख्रिस वोक्स व सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीराची भूमिका बजावणारा इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांनी आयपीएल सुरू होण्यास आठ दिवस शिल्लक असताना स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.