आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. आयपीएल २०२१ चा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. या लिलावात सर्व फ्रेंचायजी आपल्या संघात रिक्त असलेल्या जागा भरण्यावर भर देतील. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, शकीब अल हसन यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक युवा खेळाडूदेखील या लिलावासाठी उपलब्ध असतील.
भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन हादेखील या लिलावात आपले नशीब आजमावेल. प्रामुख्याने डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन अष्टपैलू म्हणून या लिलावात सहभागी होईल. २१ वर्षीय अर्जुनसाठी अनेक संघ बोली लावण्याची शक्यता आहे. आज आपण, अशा तीन संघाविषयी जाणून घेऊया, जे अर्जुनवर बोली लावू शकतात.
१) राजस्थान रॉयल्स
आयपीएलमध्ये युवा खेळाडूंना सर्वाधिक संधी देणारा संघ म्हणून राजस्थान रॉयल्सला ओळखला जातो. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून युसुफ पठाण, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन यासारखे खेळाडू भारतीय संघाला दिले आहेत. सध्या रॉयल्सकडे चांगल्या भारतीय वेगवान गोलंदाजाची जागा रिक्त आहे. अर्जुन चांगल्या वेगात गोलंदाजी करत असल्याने राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापन त्याच्यावर बोली लावू शकते.
२) मुंबई इंडियन्स
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेला मुंबई इंडियन्स अर्जुनवर बोली लावण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण, अर्जुनचे वडील आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर या संघाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर आहे. तसेच मुंबई इंडियन्स दुसऱ्या फळीतील भारतीय वेगवान गोलंदाजांच्या शोधात असल्याने त्यांचा हा शोध अर्जुनपाशी येऊन थांबू शकतो. तसेच, हार्दिक पंड्यासोबत खालच्या क्रमांकावर येऊन फटकेबाजी करण्यास अर्जुन समर्थ आहे.
३) किंग्स इलेव्हन पंजाब
भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल नेतृत्व करत असलेला किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ अर्जुन तेंडुलकरवर बोली लावू शकतो. या लिलावासाठी पंजाब संघाकडे सर्वाधिक ५४ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये सध्या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची जागा रिकामी आहे. अनिल कुंबळे प्रशिक्षक असलेला पंजाब संघ अष्टपैलू म्हणून अर्जुनची निवड आपल्या संघात करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
इशांत शर्माच्या इनस्विंगरवर रॉरी बर्न्स ठरला अंपायर्स कॉलचा बळी, पाहा व्हिडिओ
दुसऱ्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवत वेस्ट इंडिजचा बांगलादेशला व्हाईटवॉश
आर अश्विनच्या गोलंदाजीविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच पण ब्रॉडने ‘हा’ नकोसा विक्रमही केला