गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. परंतु कसोटी क्रिकेटचा प्रभाव वाढविण्यासाठी आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा २०१९ पासून सुरू करण्यात आली आणि काही नवीन नियमांसह खेळली जात आहे.
ज्या दोन संघांचे गुण सर्वात जास्त असतील त्या दोन संघांना जून २०२१मध्ये अंतिम सामन्यात स्थान मिळेल. सध्या भारतीय संघ ३६० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.
आज जाणून घेऊया त्या ३ संघांबद्दल जे आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकतात. तसेच ही स्पर्धा जिंकण्यासाठी जे प्रबळ दावेदार आहेत.
१. भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team)
कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाने ४ मालिका खेळून ३६० गुण मिळवले आहेत. ज्यामध्ये परदेशी भूमीवर दोन मालिका आणि घरच्या मैदानावर त्याच दोन मालिका भारतीय संघ खेळला आहे.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला २ सामन्यात, दक्षिण आफ्रिकेला ३ आणि बांगलादेशला २ सामन्यात पराभूत केले आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध त्यांना २-० ने पराभव पत्करावा लागला.
पुढे भारतालाऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर, तर इंग्लंडविरूद्ध भारतामध्ये खेळायचे आहे.
कोहलीच्या संघाने या दोन्हीपैकी कोणतीही मालिका स्वत: च्या नावावर केली तर अंतिम फेरीत भारताचे स्थान जवळपास निश्चित होईल. भारतीय संघाची कामगिरी पाहता लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात विजय मिळवणे अवघड वाटत नाही. त्यांच्याकडे सामने जिंकून देणारे खेळाडू आहेत.
२. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team)
चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेनुसार टिम पेनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाचा संघ दुसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने केवळ ३ मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेमध्ये त्यांनी २-२ अशी बरोबरी साधली. ही मालिका इंग्लंडमध्ये खेळली गेली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने घरच्या मैदानावर पाकिस्तान संघाचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही पूर्णपणे वर्चस्व राखत ३ सामने जिंकले. ज्यामुळे आता २९६ गुणांसह ऑस्ट्रेलिया संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. पुढे त्यांना आणखी ३ महत्त्वाच्या मालिका खेळायच्या आहेत.
ऑस्ट्रेलिया संघाला घरच्या मैदानावर भारतीय संघाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना बांगलादेशविरुद्धही खेळावे लागणार आहे. बांगलादेशने यापूर्वी त्यांना एक जबदस्त टक्कर दिली होती. पण स्मिथ, वॉर्नर सारख्या खेळाडूंच्या पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे खूप कठीण आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या जेतेपदासाठीही प्रबळ दावेदार आहे.
३. न्यूझीलंड क्रिकेट संघ (New Zealand Cricket Team)
केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. खराब सुरुवातीनंतर त्यांच्या संघाने चांगले पुनरागमन केलं आहे. ज्यामुळे आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढत आहेत.
न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत केली. पण नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा दारुण पराभव झाला. परदेशात जाऊन त्यांनी या दोन्ही मालिका खेळल्या. परंतु जेव्हा ते भारतीय संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरले, तेव्हा त्यांनी शानदार विजय नोंदविला.
केन विल्यमसनचा संघ पुढे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांचा सामना करेल. जर न्यूझीलंड संघ या मालिकेत अधिक चांगली कामगिरी करू शकला तर तो अंतिम सामन्यात त्यांची जागा निश्चित करू शकेल.
वाचनीय लेख –
आयपीएलमध्ये युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळलेले ४ दिग्गज कर्णधार; गांगुलीचाही आहे समावेश
डेनिस लिली थेट ॲल्युमिनियमची बॅट घेऊनच मैदानात उतरला आणि मग सुरु झाला…
टॉप ७: कसोटी कर्णधारांची गमतीशीर आकडेवारी