-महेश गौतम वाघमारे
क्रिकेटमध्ये एका हाताने फलंदाजी करून दुसऱ्या हाताने गोलंदाजी करणारे अनेक खेळाडू आपल्याला पहायला मिळतात. घरगुती स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अशी विविधता असलेल्या खेळाडूंची कमतरता नाही. या वैविध्यपूर्ण खेळाडूंमुळे कर्णधाराला पुरेसे पर्याय उपलब्ध होतात. लान्स क्लुजनर, ख्रिस गेल पासून सध्याचे आघाडीचे अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स व जिमी निशाम यांचा यामध्ये समावेश होतो.
आजच्या लेखात आपण, अशीच विविधता असणारे ५ भारतीय क्रिकेटपटू पाहणार आहोत.
१. सुरेश रैना
सध्या भारतीय संघाबाहेर असलेला सुरेश रैना (Suresh Raina) हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करत असलेला आपण पाहतो. चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या, आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकवणाऱ्या रैनाने कामचलाऊच्या गोलंदाजाच्या चौकटीतून बाहेर येऊन, एका कसलेल्या फिरकी गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजीने भारतीय संघाच्या तसेच चेन्नई सुपर किंग्सच्या अनेक विजयात महत्त्वाचाची भूमिका बजावली आहे. या अनेक बाबींमुळे रैना एक परिपूर्ण अष्टपैलू म्हणून गणला जाऊ लागला.
त्याने भारतीय संघाकडून एकूण १८ कसोटी सामने, २२६ वनडे सामने आणि ७८ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७६८ धावा, वनडेत ५६१५ धावा आणि टी२०त १६०५ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना कसोटीत १३ विकेट्स, वनडेत ३६ विकेट्स आणि टी२०त १३ विकेट्स घेतल्या आहेत.
२. रॉबिन सिंह
भारतीय क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाची परिभाषा ज्याने बदलली, असा रॉबिन सिंग (Robin Singh) देखील याच पठडीतील खेळाडू. भारतासाठी १३६ वनडे सामने खेळलेल्या या खेळाडूने ६-७ व्या क्रमांकावर अजय जडेजासोबत आक्रमक फलंदाजी करत सर्व संघांच्या नाकीनऊ आणले होते. मध्यमगती गोलंदाजी करत हमखास बळी मिळवणे ही त्यांची खासियत होती. मोहम्मद अझरुद्दीनच्या विश्वासू खेळाडूंपैकी रॉबिन ओळखला जातो. निवृत्तीनंतरही प्रशिक्षक म्हणूनही त्यानी नाव कमावले.
त्याने भारतीय संघाकडून केवळ १ कसोटी सामना आणि १३६ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत २७ आणि वनडेत २३३६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना कसोटीत त्यांनी एकही विकेट घेता आली नाही, तर वनडेत त्यांनी ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
३. सौरव गांगुली
भारताच्या क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्यात ज्याचा मोठा हात होता, भारताचा यशस्वी कर्णधार ‘दादा’ सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सुद्धा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजारपेक्षा जास्त धावा नावावर असणाऱ्या दादाने वेळ पडेल तेव्हा आपल्या ‘कंजूस’ मध्यमगती गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवत श्रीनाथ, झहीर, नेहरा यांना योग्य साथ दिली. विशेषत: परदेशी खेळपट्टीवर दादाची गोलंदाजी उपयुक्त ठरायची.
गांगुलीने भारताकडून एकूण ११३ कसोटी आणि ३११ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ७२१२ धावा आणि वनडेत ११३६३ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याने कसोटीत ३२ विकेट्स, तर वनडेत १०० विकेट्स घेतल्या आहेत.
४. वॉशिंग्टन सुंदर
ज्युनियर क्रिकेटमध्ये एक परिपूर्ण फलंदाज म्हणून गौरवला गेलेला वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) २०१७च्या आयपीएल मध्ये आर अश्विनचा बदली खेळाडू म्हणून पुण्याच्या चमूत सामिल झाला. त्याचबरोबर एमएस धोनीसारख्या जोहरीने त्याची पारख करत, त्याचा गोलंदाजीवर विश्वास दाखवत त्यातील गोलंदाज बाहेर काढला.
सर्वात कमी वयामध्ये टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करत आपल्या फिरकीच्या जोरावर २०१८ च्या निदाहास ट्रॉफीचा (जी दिनेश कार्तिकच्या शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारासाठी ओळखली जाते) मालिकावीर देखील ठरला. तो भारतीय टी२० संघाचा नियमित सदस्य आहे. भविष्यातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अनेक जाणकार त्याची प्रशंसा करतात.
त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत १ वनडे आणि २३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत एकही धाव केली नाही, तर टी२०त त्याने केवळ २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना मात्र त्याने वनडेत केवळ १ आणि टी२०त १९ विकेट्स घेतल्या आहेत.
५. शिवम दुबे
घरेलू क्रिकेटमधील एक मोठे नाव म्हणून शिवम दुबे (Shivam Dube) ओळखला जातो. एका षटकात पाच षटकार मारण्याची किमया या मुंबईकर अष्टपैलूने दोन वेळा केली आहे. २०१९ च्या आयपीएलच्या लिलावात पाच करोड इतक्या महागड्या किमतीत विराट कोहलीच्या बेंगलोर संघाने त्याला संघात सामिल करून घेतले. उंचपुरा, धिप्पाड, कमालीचा आक्रमक फलंदाज आणि वेगवान गोलंदाजी सोबतच उत्तम क्षेत्ररक्षण त्याचा जमेच्या बाजू आहेत.
हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करत शिवमने २०१९मध्ये विंडीज विरुद्ध ३० चेंडूत ५४ धावा करत सर्वांचे लक्ष वेधले. बीसीसीआय शिवमवर विशेष लक्ष ठेवून आहे. आगामी टी२० विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी सुंदर व शिवममध्ये स्पर्धा असेल.
दुबेने भारतीय संघाकडून आतापर्यंत १ वनडे आणि १३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने वनडेत केवळ ९ धावा आणि टी२०त १०५ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना त्याला वनडेत एकही विकेट घेता आली नाही. परंतु त्याने टी२०त ५ विकेट्स घेतल्या आहेत.