आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले होते.
केएल राहुलने केला विक्रम
हा सामना केएल राहुलच्या आयपीएल कारकिर्दीतील ६९वा सामना होता. त्याने ६९ सामन्यात ६० डावात फलंदाजी करताना १६ अर्धशतके व २ शतकाच्या मदतीने २ हजार ६८ धावा केल्या आहेत. याबरोबर आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या ६० डावात सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ख्रिस गेलसह दुसऱ्या स्थानी आला आहे. शॉन मॉर्शने आयपीएलच्या पहिल्या ६० डावांत १८ अर्धशतके केलेली आहेत.
पहिल्या ६० डावांत सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज
आयपीएलमध्ये पहिल्या ६० डावांत ख्रिस गेलने १६, माईक हसीने १५ व शिखर धवनने १५ अर्धशतके केली आहेत.
२०१८पासून आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे फलंदाज
आयपीएलमध्ये २०१८पासून सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये केएल राहुल अव्वल स्थानी आला आहे. त्याने या काळात १४ अर्धशतके केली आहेत. केएलपाठोपाठ एबी डिविलियर्सने १२, रिषभ पंतने ९, शिखर धवनने ९, डेविड वॉर्नरने ९ आणि केन विलियमसनने ९ अर्धशतके केली आहेत.