भारतात सध्या कोरोना व्हायरस हाहाकार माजवत आहे. त्यामुळे खेळाच्या मैदानावर देशाचा गौरव करणारे काही भारतीय खेळाडू आता लॉकडाऊन दरम्यान पोलीसांच्या भूमिकेत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ते रस्त्यावर उतरून लोकांना घरात रहाण्याचे आवाहन करत आहेत.
या खेळाडूंमध्ये भारताचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू जोगिंदर शर्मा, भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपाल सिंग, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर अखिल कुमार आणि आशियाई चॅम्पियन कबड्डीपटू अजय ठाकूर हे सर्व खेळाडू आता पूर्णवेळ पोलीस अधिकारी आहेत. आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ही नोकरी मिळाली.
या खेळाडूंपैकी काही खेळाडूंनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत घेतलेली भूमिका आपण पाहणार आहोत.
जोगिंदर शर्मा- (डीएसपी, हरियाणा पोलीस)
भारताकडून २००७च्या क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकणारा व शानदार विजय मिळवुन देणारा जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) सध्या हरियाणा पोलिसांत डीएसपी पदावर आहे.
त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून “आम्हाला सहकार्य करा. आपण सगळे मिळून या कोरोनाचा नायनाट करु. बाहेर पडू नका,” असे सांगितले आहे.
त्याचबरोबर तो म्हणाला की, “यावेळी एक वेगळेच आव्हान आहे. आमची ड्यूटी ही सकाळी ६ वाजता सुरु होते. ज्यामध्ये आम्ही लोकांना जागरूक करणे, लॉकडाऊनचे पालन करणे आणि चिकित्सक सुविधा देण्यासारखी कामे करतो.”
राजपाल सिंग- (डीएसपी, मोहाली)
भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार राजपाल सिंग (Rajpal Singh) सध्या मोहालीमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. कोरोना व्हायरसबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी पूर्णवेळ पोलीस अधिकारी म्हणून काम करत आहे. तसेच यावेळी आमचे मुख्य काम हे लॉकडाऊनचे पालन करणे आहे. त्याचबरोबर गरजू लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवण्यावरही आम्ही भर देत आहोत.”
राजपालने भारतीय संघाला अनेक ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०११ साली त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अखिल कुमार- (डीएसपी, गुरुग्राम)
राष्ट्रकुल स्पर्धेत २००६ साली सुवर्णपदक मिळविणारा बॉक्सर अखिल कुमार (Akhil Kumar) सध्या गुरुग्राम येथे डीएसपी पदावर कार्यरत आहे.
सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “लोक आता सहकार्य करत आहेत. तसेच आवश्यक असलेल्या गोष्टी मिळाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण नाही. लॉकडाऊनचे सक्तीने पालन केल्यानेच या व्हायरसला आपण नष्ट करू शकतो. लोकांना हे समजत आहे.”
अखिलला २००५ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.
अजय ठाकूर- (डीएसपी, बिलासपुर)
अजय ठाकूर (Ajay Thakur) हा भारताचा व्यावसायिक कबड्डीपटू आहे. त्याचबरोबर तो भारतीय राष्ट्रीय कब्बडी संघाचा माजी कर्णधार आहे. सध्या तो बिलासपूर येथे हिमाचल प्रदेश पोलिसांत डीएसपी या पदावर रुजू आहे.
त्याने कोरोना व्हायरसबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आम्ही मास्क, हातमोजे आणि सॅनिटायजर्स हातात घेऊन रस्त्यावर चालतो. परंतु सर्वात मोठी सुरक्षिततेची गोष्ट म्हणजे लोकांनी रस्त्यावर उतरू नये.”
अजयने २०१६च्या कबड्डी विश्वचषकात भारतीय कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने २०१४ साली आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदकही मिळविले आहे. त्याचबरोबर २०१९मध्ये त्याला पद्मश्र आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एवढ्या मोठ्या बोर्डावर निवड होणारा गांगुली पहिलाच भारतीय व्यक्ती
-वनडेत सर्वाधिक वेळा धावबाद होणारे ५ खेळाडू, एक नाव आहे भारतीय
-सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू