कोणताही खेळ असो, प्रत्येक खेळाडूला आपल्या कारकिर्दीत कधी ना कधी निवृत्त व्हावेच लागते. आपली शारीरिक व मानसिक क्षमता पाहून अनेक खेळाडू निवृत्त होत असतात. फुटबॉल, टेनिस या खेळात तर अनेकदा असे म्हटले जाते, तिशीनंतर उच्च दर्जाच्या स्पर्धा खेळू नयेत.
क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त खेळाडू पस्तिशीनंतर खेळाला अलविदा करतात. काही विश्वचषक जिंकल्यावर किंवा त्यांनी ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचल्यानंतर क्रिकेटला राम राम करतात. मात्र, काही खेळाडू असतात जे, कारकिर्दीच्या शिखरावर असताना देखील अचानकपणे निवृत्ती घेतात.
आज अशाच, आपला स्वप्नवत फॉर्म असताना निवृत्त झालेल्या, तीन दिग्गज यष्टीरक्षक फलंदाजांविषयी जाणून घेऊया.
१) कुमार संगकारा
कुमार संगकारा कदाचित श्रीलंकेचा आतापर्यंतच्या सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. २०१४ चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर तो टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाला होता, या स्पर्धेत श्रीलंकेने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता.
त्यानंतर २०१५ विश्वचषक आला आणि संगकाराने या स्पर्धेत अनेक विक्रम मोडले. श्रीलंकेचा हा माजी कर्णधार या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्याने १०८.२ च्या अविश्वसनीय सरासरीने ५४१ धावा केल्या होत्या. ह्या विश्वचषकात त्याने सलग ४ शतकेही झळकावली होती.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर लगेचच संगकाराने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये, भारताविरुद्ध मायदेशात खेळलेल्या कसोटी मालिकेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. देशवासीयांनी आणि बोर्डाने पुनर्विचार करण्याची विनवणी केली, परंतु संगकाराने विनम्रपणे त्यास नकार दिला.
निवृत्ती वेळी संगकाराचे वय ३८ होते. पण, त्याचा फॉर्म व फिटनेस पाहता तो अजून दोन वर्ष आरामात खेळू शकत होता. संगकाराच्या निवृत्तीनंतर श्रीलंकन क्रिकेट रसातळाला गेलेले पाहायला मिळते. संगकारा सध्या एमसीसीचा अध्यक्ष आहे.
२) ब्रेंडन मॅक्युलम
ब्रेंडन मॅक्युलम न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील एक महान खेळाडू आणि कर्णधार आहे. स्फोटक फलंदाजी व कुशल नेतृत्वाच्या बळावर न्यूझीलंडला २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर २०१६ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
मॅक्युलमने सेवानिवृत्त होणार आहे, ही घोषणा केल्यानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात मॅक्युलमने पहिल्या डावात ७९ चेंडूत १४५ धावा ठोकल्या. यातील शतक अवघे ५४ चेंडूंत आले होते.
अखेरच्या सामन्यात, मॅक्युलमने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. क्रिकेटच्या सर्वात प्रदीर्घ स्वरूपात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही या खेळी दरम्यान त्याच्या नावे जमा झाला.
निवृत्तीवेळी, त्याचे वय ३६ वर्ष होते. पण, त्यावेळीही अन त्यानंतरही तो जगातील सर्वात वेगवान व चपळ क्रिकेटर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर, मॅक्युलम गुजरात लायन्स व आरसीबीसमवेत आयपीएल सारख्या विविध टी२० फ्रँचायझी लीगमध्ये खेळला. २०१९ च्या ग्लोबल टी२० लीग नंतर तो खेळाडू म्हणून पूर्णपणे बाजूला गेला. सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक म्हणून काम करतो.
३) एबी डिव्हिलियर्स
एबी डिव्हिलियर्स निवृत्त झालाय हे क्रिकेट चाहते अजूनही मान्य करत नाहीत. तिन्ही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर असताना, डिव्हिलियर्सने थकवा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे मन होत नसल्याचे कारण देत, २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून स्वतःला दूर केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या शेवटच्या वर्षात डिव्हिलियर्सने एकदिवसीय सामन्यात ५२.१८ च्या सरासरीने त्याने पाच अर्धशतके आणि दोन शतके काढत ८३५ धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १७६ धावांची खेळी देखील याचदरम्यान आली होती. कसोटीमध्ये तर तो यापेक्षाही चांगला खेळत होता. त्याने ५३.१४ ची सरासरी राखली होती. यात ७ अर्धशतक आणि १ शतक समाविष्ट होते.
असे म्हटले जाते की, दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने २०१५ विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत झालेला पराभव मनाला लावून घेतला होता आणि याच कारणाने त्याने तडकाफडकी निवृत्ती घेतली होती.
सध्याचा, द. आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार क्विंटन डी कॉक याने नुकतेच टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो असे भाकित वर्तवले होते. परंतु, कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
सध्या तो आयपीएलमध्ये आरसीबी संघासाठी उपकर्णधाराची भूमिका बजावतो. गेली दहा वर्ष आरसीबी संघाचा तो अविभाज्य घटक आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या युवराजने ब्रॉडला ६ षटकार ठोकले, तोच युवराज आज ब्रॉडला म्हणतोय…
आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर
आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…