स्टीव स्मिथला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवण्याची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा सध्याचा कर्णधार टीम पेन याच्या वक्तव्यामुळे आता या मागणीचा आणखीनच जोर वाढला आहे. स्मिथवर 2018 साली जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये चेंडू छेडछाडप्रकरणासाठी 12 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर पेनला ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार बनवण्यात आले होते.
पण स्मिथने ही बंदी पूर्ण करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याला आता पुन्हा कर्णधारपद देण्यात यावे अशी मागणी वाढत आहे. याबद्दल बोलताना आता पेनने म्हटले आहे की जेव्हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार बदलण्याची वेळ येईल तेव्हा तो स्टीव स्मिथला पाठिंबा देईल.
स्मिथने देखील पुन्हा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर्षी मार्चमध्ये त्याने सांगितले की पुन्हा कर्णधारपद मिळाल्यास त्याला आनंदच होईल. यावर पेनने आता म्हटले आहे की कर्णधारपदासाठी स्मिथच्या नावाचा विचार केला पाहिजे. तो म्हणाला, “मला वाटते की त्याला कर्णधार बनवावे. तथापि, ते माझ्या हातात नाही. पण, जेव्हा मी स्मिथच्या नेतृत्वात खेळलो, तेव्हा तो या भूमिकेत उत्तम होता.”
पेन पुढे म्हणाला, “कर्णधार म्हणून स्मिथ योग्य निर्णय घेतो. त्याच्या नेतृत्वात सर्व काही व्यवस्थित चालू होते. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची घटना घडली आणि कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले. पण हो, त्याला पुन्हा कर्णधार बनवण्याविषयी चर्चा झाल्यास माझा पाठिंबा त्याला आहे. ”
अनेक क्रिकेट पंडित ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदासाठी स्मिथच्या नावाची चर्चा करत आहेत. ऑस्ट्रेलियाला नुकतेच पेनच्या नेतृत्वाखाली खेळताना आपल्या घरच्या मैदानावर भारताकडून कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे स्मिथला कर्णधारपद मिळण्याची शक्यता आणखीनच वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत जगातील सर्वात जास्त मानधन घेणारे क्रिकेटपटू; पहिल्या पाच जणांत नाही विराट
झाला का घोटाळा? माईक हसीची ऑस्ट्रेलियाला जाण्याची वाट बसली अवघड होऊन
ब्रेकिंग! टीम इंडियाला मिळाला नवा प्रशिक्षक, रमेश पोवार झालेत भारतीय संघाचे नवे महागुरू