मुंबई । ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी जागतिक टी 20 संघ निवडला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. तसेच संघात विराट कोहली याला देखील सामील केले आहे.
आयपीएलमधील रोहित शर्माचे विक्रम पाहून त्याला कर्णधार निवडले असल्याचे ‘क्रिकबझ’ या वेबसाईटच्या कार्यक्रमात बोलताना टॉम मुडी यांनी सांगितले. ते म्हणाले, “रोहितने सर्वाधिक वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या संघास जिंकून दिली आहे. निवडण्यात आलेले खेळाडू हे आप आपल्या संघातून पुढील दहा वर्षे सहज खेळू शकतील, असे खेळाडू निवडण्यात आले आहेत.”
टॉम मुडी यांनी सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांच्याकडे सोपवली आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीविलीयर्सवा निवडले आहे. पाचव्या क्रमांकासाठी ते जोस बटलर यांची निवड करणार होते. मात्र संघातला समतोल साधण्यासाठी त्यांनी डाव्या हाताने खेळणारा वेस्ट इंडीजचा निकोलस पूरन याला स्थान दिले.
मुडी यांनी आपल्या संघात एमएस धोनीला स्थान दिले नाही. ते म्हणाले, ” मी धोनीचा खूप मोठा फॅन आहे. धोनीने कर्णधार आणि खेळाडू म्हणून जे काही मिळवले आहे ते अविश्वसनीय आहे.”
सहाव्या क्रमांकासाठी आंद्रे रसेल तर सातव्या क्रमांकावर सुनील नरेन याला संधी दिली. टॉम मुडी यांच्या संघात जसप्रीत बुमराह या एकमात्र भारतीय गोलंदाज आहे. याशिवाय मिचेल स्टार्क, राशिद खान आणि जोफ्रा आर्चर यांनाही संधी दिली आहे. तर रवींद्र जडेजा याला राखीव खेळाडू म्हणून निवडले आहे.