गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंडच्या संघात या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर होणार्या या सामन्यातून क्रिकेट विश्वाला कसोटी क्रिकेटचा पहिलावहिला जगज्जेता मिळेल. या तीन वर्ष चाललेल्या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने खेळल्या गेले. या दरम्यान अनेक दर्जेदार फलंदाजांनी काही अविस्मरणीय खेळी पेश केल्या. या लेखात आपण अशाच चार खेळींचा आढावा घेऊया.
१) स्टीव्ह स्मिथ (१४४)- २०१८ सालच्या चेंडू छेडछाड प्रकरणाची बंदी पूर्ण करुन स्टीव्ह स्मिथने पुनरागमन केले, त्या कसोटी सामन्याची ही गोष्ट. इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेचा तो पहिला सामना होता. हा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा देखील पहिला सामना होता. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर स्मिथ फलंदाजीला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाची २ बाद १७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर देखील इंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलिया ८ बाद १२२ अशा नाजूक अवस्थेत सापडली होती. मात्र स्मिथने एका बाजूने झुंजार खेळी करत या डावात चक्क १४४ धावांची अफाट खेळी केली. त्याने दुसर्या डावात देखील १४२ धावांची खेळी केली. आणि परिणामी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला या सामन्यात मात दिली.
२) बेन स्टोक्स (१३५)- २०१९ च्याच अॅशेस मालिकेत बेन स्टोक्सने हेडिंग्लेच्या मैदानावर एक अविस्मरणीय खेळी साकारली. या सामन्यात चौथ्या डावात इंग्लंडला ३५९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. त्याचा पाठलाग करतांना इंग्लंडचा संघ एकवेळ ५ बाद २४५ आणि नंतर ९ बाद २८१ अशा परिस्थितीत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलिया सहज हा सामना खिशात टाकेल, असे वाटले होते. मात्र स्टोक्सचे इरादे काही वेगळेच होते. त्याने अकराव्या क्रमांकावरील जॅक लीचला साथीला घेत इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. या डावात त्याने २१९ चेंडूत नाबाद १३५ धावांची खेळी उभारली होती.
३) कायले मेयर्स (२१०*)- वेस्ट इंडिजचा पदार्पणवीर कायले मेयर्सने देखील अशीच एक तुफानी खेळी करत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला ठसा उमटवला होता. बांग्लादेशविरुद्ध चट्टोग्रामच्या मैदानावरच्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजला चौथ्या डावात विजयासाठी ३९५ धावांचे विशाल लक्ष्य मिळाले होते. त्याचा पाठलाग करतांना वेस्ट इंडिजची ३ बाद ५९ अशी अवस्था असतांना पदार्पणवीर मेयर्स मैदानात आला. त्यानंतर अक्षरशः त्याने खेळाचा ताबा घेतला. बांग्लादेशच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी केली. या डावात त्याने ६७.७४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतांना नाबाद २१० धावांची खेळी केली. याच जोरावर वेस्ट इंडिजने ३ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला.
४) रिषभ पंत (८९*)- रिषभ पंतने ऑस्ट्रेलियातील गाबाच्या मैदानावर खेळलेल्या या खेळीचे कवित्व कित्येक दशके गायले जाईल, इतकी ती खेळी अजरामर आहे. या खेळीने भारताला आपल्या क्रिकेट इतिहासातील कदाचित सर्वोत्तम मानला जाणारा कसोटी मालिका विजय प्राप्त करता आला. ऑस्ट्रेलियातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा चौथा सामना होता. या सामन्याच्या शेवटच्या डावात भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
सलामीवीर शुभमन गिलने ९ १ धावांची खेळी करत आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकवत विजयाची पायाभरणी केली होती. मात्र हे दोघे बाद झाल्यावर आणि त्यापाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे देखील बाद झाल्यावर हा विजय भारताकडून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सहाव्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंतने निडर फलंदाजी करत नाबाद ८९ धावांची खेळी केली आणि भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या या खेळीमुळे भारताला २-१ असा कसोटी मालिका विजय साकारता आला.
महत्त्वाच्या बातम्या:
कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला या ६ न्यूझीलंडच्या खेळाडूंपासून आहे सर्वाधिक धोका
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ: बांग्लादेशचा मुशफिकुर रहीम ठरला मे महिन्याचा मानकरी
वॉर्नर कुटुंबाचा पंजाबी तडका! सोशल मीडियावर व्हायरल होतोय भन्नाट डान्सचा व्हिडिओ