क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं कि जेवढा जास्त वेळ तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहाल तेवढ्या जास्त तुमच्या धावा होतील. क्रिकेटची सुरुवात कसोटी सामन्यांनी झाल्यावर १९७१ मध्ये वनडे सामन्यांना सुरुवात झाली.
पण वनडे सामन्यांवर कसोटी सामन्यांचा प्रभाव असल्याने सुरुवातीला सामने खूपच हळू खेळलं जायचे. वनडे सामन्यात एकाच डावामध्ये सर्वात जास्त चेंडू खेळणाऱ्या टॉप ५ खेळाडूंविषयी बोलायचं झालचं तर रोहित शर्मा वगळता बाकी सर्व फलंदाजांनी पहिल्या ३ विश्वचषकामध्ये ती कामगिरी केलेली आहे आणि रोहित शर्मा शिवाय इतर फलंदाजांनी केलेले हे विक्रम ६० षटकांच्या सामन्यात झाले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत केवळ एकाच फलंदाजाने २००हून अधिक चेंडू खेळले आहेत. तो म्हणजे न्यूझीलंडचा माजी कर्णधार ग्लेन टर्नर.
तर जाणून घेऊयात वनडेमध्ये सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या ५ फलंदाजांबद्दल….
१) ग्लेन टर्नर
१९७५ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार ग्लेन टर्नर तुफान फॉर्ममध्ये होता. त्याने ईस्ट आफ्रिकेविरुद्ध बर्मिंगहम येथे तब्बल २०१ चेंडूत १७१ धावांची नाबाद खेळी केली होती. ज्यामुळे न्यूझीलंडने निर्धारित ६० षटकात ३०९/५ अशी धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तर देताना ईस्ट आफ्रिकेचा डाव १२८/८ धावांवर थांबला.
१९७५ च्याच विश्वचषक स्पर्धेमध्ये मँचेस्टर मध्ये भारताविरुद्ध ग्लेन टर्नरने अजून एक शतक ठोकत १७७ चेंडूत ११४ धावा केल्या. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २३० धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्त्युत्तरात न्यूझीलंडने हा सामना ५८.५ षटकांत ६ विकेट गमावून जिंकला.
यामुळे ग्लेन टर्नर सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिला आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२) सुनील गावसकर
१९७५ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सुनील गावस्कर यांनी एक अत्यंत संथ खेळी केली होती ज्याची चर्चा आजही होते. लॉर्डस मैदानावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने डेनिस एमीस(१३७) च्या शतकाच्या जोरावर ६० षटकांत ३३४/४ अशी विशाल धावसंख्या उभारली. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ६० षटकांत केवळ १३२/३ एवढीच धावसंख्या उभारू शकला. ज्यात सुनील गावसकरांनी तब्बल १७४ चेंडूंचा सामना करत फक्त ३६ धावा केल्या आणि नाबाद राहिले.
३) मोहसीन खान
पाकिस्तानच्या मोहसीन खानने १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध उपांत्यफेरीत १७६ चेंडूत ७० धावांची संथ खेळी केली. ओव्हल मैदानावर पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६० षटकांत १८४/४ अशी अगदीच किरकोळ धावसंख्या उभारली ज्याचा विजयी पाठलाग करताना वेस्ट इंडीजने विवियन रिचर्ड्सच्या नाबाद ८० धावांच्या जोरावर ४८.४ षटकांत केवळ २ विकेट गमावून सामना जिंकला.
४) रोहित शर्मा
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३ द्वीशतके झळकावणारा एकमेव खेळाडू आहे. २०१४ मध्ये कोलकत्त्यात रोहितने वनडे क्रिकेटमधली आत्तापर्यंतची वैयक्तिक उच्चांकी धावसंख्या उभारली. रोहितने श्रीलंकेविरुद्ध १७३ चेंडूत २६४ धावांची घणाघाती खेळी केली. यामुळे भारताने ४०४/५ अशी मोठी धावसंख्या उभारली. याबदल्यात श्रीलंकेचा डाव रोहितच्या एकूण धावांपुढेही जाऊ शकला नाही व २५१ धावांवर संपुष्टात आला. ५० षटकांच्या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळणारा फलंदाज रोहित शर्मा हाच आहे.
५) सर गोर्डन ग्रीनीज
१९७९च्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजकडून भारताला ९ विकेटने अत्यंत अपमानजनक हार पत्करायला लावली. बर्मिंगहम येथे प्रथम फलंदाजी करताना भारताने गुंडाप्पा विश्वनाथच्या ७५ धावांच्या जोरावर एकूण १९० धावांचे आव्हान समोर ठेवले. ज्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडीजने सर गोर्डन ग्रीनीज यांच्या १७३ चेंडूतील १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर केवळ एक विकेट गमावून सामना जिंकला. सामनावीराचा किताब सर गोर्डन ग्रीनीज यांनीच पटकावला होता.