येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघातील फलंदाजांचे चांगल्या फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहलीला शतक झळकावण्यात अपयश आले आहे. परंतु विराटच नव्हे तर भारतीय कसोटी संघातील आणखी काही फलंदाज आहेत, ज्यांना शतकाची प्रतिक्षा आहे. चला तर पाहूया कोण आहेत ते फलंदाज?
१) रोहित शर्मा : भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु त्याला देखील गेल्या ४ डावात शतक झळकावण्यात अपयश आले आहे. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शतक झळकावले होते. आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा कडे शतक झळकावण्याची उत्तम संधी असणार आहे.
२) शुबमन गिल : भारतीय संघांचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. ज्यामुळे त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील संधी देण्यात आली होती. गिलने आतापर्यंत एकूण ७ सामने खेळले आहेत. यात त्याला ३७८ धावा करण्यात यश आले आहे. परंतु त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये.
३) चेतेश्वर पुजारा : भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याला गेल्या २८ डावात एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर झळकावले होते. त्यावेळी त्याने १९३ धावांची खेळी केली होती.
४) विराट कोहली : भारतीय संघाचा कर्णधार आणि रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा मॉर्डनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी वयात ७० शतके झळकावणाऱ्या विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांपासून शतक करण्यासाठी वाट पहावी लागत आहे. तो शतकाच्या जवळ पोहोचला आहे. परंतु त्याला शतक झळकावण्यात अपयश आले आहे. गेल्या १२ डावात त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने शेवटचे शतक बांगलादेश संघाविरुद्ध २०१९ साली लगावले होते.
५) अजिंक्य रहाणे : भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, याला देखील गेल्या काही सामन्यांपासून शतक झळकावण्यात अपयश आले आहे. रहाणेने शेवटचे शतक मेलबर्नच्या मैदानावर झळकावले होते. त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ११२ धावांची खेळी केली होती. तसेच गेल्या ११ डावात त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये.
६) रिषभ पंत : भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने भारतीय संघाला अनेकदा संकटातून बाहेर काढले आहे. परंतु गेल्या ४ डावात त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या शतकाची प्रतिक्षा कधी संपणार? पाकिस्तानी दिग्गज म्हणतो, “कोहलीसारखा फलंदाज…”
कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण
BANvSL: श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, आजचा वनडे सामना होणार की नाही? पाहा