नवी दिल्ली | आयपीएल 2020 च्या 13 व्या हंगामातील तिसरा सामना सोमवारी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने हा सामना 10 धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अव्वल अष्टपैलू क्रिकेटपटू व हैद्राबाद संघाचा खेळाडू मिशेल मार्श जखमी झाला. जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा खाते न उघडताच बाद झाला. याचमुळे सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.
दुखापतग्रस्त असूनही तो फलंदाजीसाठी आला मैदानात
पहिल्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना मिशेल मार्शला घोट्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला. आरसीबी संघ प्रथम फलंदाजीला आला होता. मिशेल मार्श डावाच्या पाचव्या षटकात गोलंदाजी करत असताना त्याचा पाय मुरडला आणि तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी विजय शंकरने षटक पूर्ण केले. तो आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान मैदानात परतला नाही. वेस्टइंडिजचा क्रिकेटपटू फॅबियन ऍलन मार्शच्या जागी मैदानात क्षेत्ररक्षनासाठी आला होता.
मात्र सनरायझर्स हैदराबाद संघ जेव्हा फलंदाजीला आला व संघ जेव्हा संकाटात होता तेव्हा मार्श नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. जेव्हा मार्श फलंदाजीला आला तेव्हा त्याला नीट चालणेही शक्य नव्हते. मार्श एकही धाव न काढता झेलबाद झाला. त्याला मैदानाबाहेर जाण्यासाठी फिजिओचीही गरज पडली. मार्श शून्यावर बाद झाला असला तरी त्याच्या धाडसाने चाहत्यांची मने जिंकली. याचमुळे ट्विटरसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे कौतुक होत आहे.
हैद्राबाद संघाचा झाला पराभव
बेंगलोरला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केल्यानंतर हैदराबादविरु्द्ध बेंलगोरने ५ बाद १६३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 19.4 षटकांत 153 धावांवर बाद झाला. जॉनी बेयरस्टो (43 चेंडूत 61 धावा, 6 चौकार, 2 षटकार) आणि मनीष पांडे (33 चेंडूत 34 धावा, 3 चौकार, 1 षटकार) यांनी दुसर्या गाड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली होती. परंतू ही भागीदारी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.