मॅच फिक्सिंगचे भूत काही केल्या क्रिकेटवरून हटण्याचे नाव घेईना. मागील अनेक प्रकरणांवरून धडा न घेता आजही कोणत्या ना कोणत्या स्तरावर मॅच फिक्सिंग होत असते. नुकतेच आयसीसीने संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दोन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याकारणाने निलंबनाची कारवाई केली आहे. दोन वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात हे दोन्ही खेळाडू दोषी सापडले. क्रिकेटची प्रतिमा डागळली जात असल्याने, आयसीसी मॅच फिक्सिंग करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाईचा बडगा उगारते.
युएईचे खेळाडू सापडले दोषी
आयसीसीने अधिकृतरित्या एक पत्रक काढून मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी असणाऱ्या युएईच्या दोन खेळाडूंना निलंबित केल्याचे जाहीर केले. आयसीसीने म्हटले आहे की, “मोहम्मद नावेद व शमीन अन्वर बट या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन खेळाडूंना निलंबित करण्यात येत आहे. या दोघांना ऑक्टोबर २०१९ मध्ये टी२० विश्वचषक क्वालिफायरवेळी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने मॅच फिक्सिंग प्रकरणात पकडले होते. या खेळाडूंना त्यावेळीच निलंबित करण्यात आले होते. आणि आता त्यांच्यावरील निलंबन कायम राहणार आहे. हे दोन्ही खेळाडू कोणत्याही प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकत नाहीत.”
या कलमान्वये केली कारवाई
जागतिक क्रिकेटच्या संचलन करणाऱ्या आयसीसीने आयसीसी भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या अनुच्छेद २.१.१ व २.४.४ या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. परंतु, या दोन्ही खेळाडूंवर किती काळासाठी निर्बंध घातले गेले आहेत, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
मॅच फिक्सिंगने या खेळाडूंची कारकीर्द झाली समाप्त
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग प्रकरणात सापडल्याने अनेक दिग्गज खेळाडूंची कारकीर्द संपुष्टात आली होती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए हे दिग्गज खेळाडू मॅच फिक्सिंगमुळे अवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडले. भारताचा श्रीसंत, पाकिस्तानचा सलमान बट, मोहम्मद अमिर, मोहम्मद आसिफ यांसारखे खेळाडूही मॅच फिक्सिंगमुळे आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुढे नेऊ शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
फ्लॅशबॅक! २०१२ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर धोनी-गंभीर वाद आला होता चव्हाट्यावर
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : बडोद्याचा उपांत्यपूर्व फेरीत रोमांचक विजय, विष्णू सोळंकी ठरला नायक
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेआधी पंत धोनीच्या भेटीला, साक्षीने शेअर केले फोटो