पुणे । गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर टायफून्स संघाने लायन्स संघावर ४७ धावांनी मात करून पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी जेट सिंथेसिसचे अध्यक्ष राकेश नवाणी, जितेंद्र घडोक ग्रुपचे जितेंद्र घडोक, आदर्श हेगडे, सचिन राठी, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, उपाध्यक्ष नितीन देसाई, स्पोर्टस चेअरमन शशांक हळबे उपस्थित होते. जेट सिंथेसिस,मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते.
अंतिम लढतीत टायफून्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना टायफून्स संघाने २ बाद ८९ धावा केल्या. यात मेहुल राठोडने १० चेंडूंत ३ षटकार व १ चौकारसह नाबाद २९ धावा केल्या, तर भूषण पालरेशाने १० चेंडूंत दोन चौकार व दोन षटकारांसह २३ धावा केल्या. वरुण श्रीवास्तवने १३ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या.
वरुण-मेहुल जोडीने तिस-या गड्यासाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना लायन्स संघाला ७ बाद ४२ धावाच करता आल्या. लायन्सकडून केवळ मनोपाल सेहेम्बे लाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. यावेळी वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात आली. यामध्ये मालिकावीर आश्विन शहा, सर्वोत्तम फलंदाज किरण देशमुख आणि तुषार असवाणी यांनी सर्वोत्तम गोलंदाज असा किताब पटकाविला.
संक्षिप्त धावफलक –
टायफून्स – ६ षटकांत २ बाद ८९ (मेहुल राठोड नाबाद २९, वरुण श्रीवास्तव नाबाद २६, भूषण पालरेशा २३, भरत शहा १-१३, आशिष गुजिरे १-२०) वि. वि. लायन्स – ६ षटकांत ७ बाद ४२ (मनोपाल सेहेम्बे २३, अश्विन शहा २-७, क्रिश शहा १-४, चेतन घुवालेवाला १-१७, स्पंदन १-२, मेहुल राठोड १-३). सामनावीर-मेहूल राठोड