टायफून्स – लायन्समध्ये अंतिम लढत रंगणार

पुणे । टायफून्स आणि लायन्स यांच्यात पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत अश्विन शहाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टायफून्स संघाने टायगर्स संघावर २५ धावांनी विजय मिळवला.

टायफून्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत १ बाद ८१ धावा केल्या. यात अश्विन शहाने २४ चेंडूंत ६ षटकार व २ चौकारांसह नाबाद ६० धावा केल्या. यानंतर अश्विन आणि स्पंदनने अचूक मारा करून टायगर्स संघाला ६ बाद ५६ धावांत रोखले. अश्विन आणि स्पंदनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यानंतर दुस-या उपांत्य लढतीत लायन्स संघाने व्हेव्ज संघावर नऊ गडी राखून मात केली. व्हेव्ज संघाने अरुण खट्टरच्या अर्धशतकाच्या जोरावर २ बाद ७५ धावा केल्या. यात अरुणने २३ चेंडूंत ४ षटकार व ३ चौकारांसह ५२ धावा केल्या. लायन्स संघाने विजयी लक्ष्य ५.३ षटकांत १ गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. लायन्सकडून किरण देशमुखने १६ चेंडूंत ५ षटकार व १ चौकारसह नाबाद ४४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक –

१) टायफून्स – ६ षटकांत १ बाद ८१ (अश्विन शहा नाबाद ६०, वरुण श्रीवास्तव नाबाद १७, निहाल हेमदेव १-६) वि. वि. टायगर्स – ६ षटकांत ६ बाद ५६ (आर्यन गाडगीळ २०, निहाल हेमदेव १४, स्पंदन २-६, अश्विन शहा २-६). सामनावीर – अश्विन शहा

२) व्हेव्ज – ६ षटकांत २ बाद ७५ (अरुण खट्टर ५२, झमीर शेख नाबाद १४, तुषार असवानी १-१२, किरण देशमुख १-१४) पराभूत वि. लायन्स – ५.३ षटकांत १ बाद ७६ (किरण देशमुख नाबाद ४४, तुषार असवानी नाबाद १६, मनोपाल सेहेम्बे १३, रक्षय ठक्कर १-९). सामनावीर – किरण देशमुख

You might also like