रविवारी(२४ जानेवारी) युएफसी २५७ मध्ये कॉनर मॅकग्रेगोर विरुद्ध डस्टीन पोरियर यांच्यात सामना झाला. अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात डस्टिनने दुसऱ्या राऊंडमध्ये कोनोरला पराभूत केले. त्यामुळे कॉनर पहिल्यांदाच टेक्निकल नॉकआऊटमध्ये पराभूत झाला आहे. याआधी २०१४ मध्ये कॉनरने डस्टिनला पराभूत केले होते.
रविवारी झालेल्या सामन्यात जस्टिनच्या काफ-किक्सने कॉनरला बेजार केले होते. त्यामुळे हा सामना दुसऱ्या राऊंडमध्ये गेल्यानंतर कॉनरच्या हालचालीत वेदना जाणवत होत्या. दुसऱ्या राऊंडमध्ये डस्टिनने आपला पवित्रा बदलला. त्यामुळे सामन्याचा पुर्ण नुर पलटला. या राऊंडमध्ये डस्टिन सातत्याने पंचेस मारत होता. यावेळी कॉनरने डस्टिनच्या किक आडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला त्याचे पंचेस आडवता आले नाही.
अखेर दुसऱ्या राऊंडमध्ये डस्टिनने कॉनरवर उजव्या हाताने हुक करत त्याला खाली पाडले. त्यानंतर रेफरी हर्ब डीनने सामना थांबवण्यात वेळ घेतला नाही. त्यामुळे अनुभवी कोनोरला या सामन्यात पराभूत व्हावे लागले.
असे असले तरी, या लढतीनंतर कॉनरला अंदाजे ५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास भारतीय चलनानुसार ३६ कोटी रुपये मिळाले आहेत. तर ३२ वर्षीय डस्टिनला अंदाजे १ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण ७ कोटी रुपये मिळाले.