युएईत झालेला आयपीएलचा तेरावा हंगाम संपून दोन महिने उलटले नाहीत, तोवर बीसीसीआयने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. त्याच अंतर्गत काही दिवसांपुर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम ठेवलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपला अनुभवी गोलंदाज उमेश यादव याला संघातून मुक्त केले होते. त्यानंतर आता यादव चेन्नई सुपर किंग्स संघात सहभागी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
झाले असे की, यादवने आयपीएल २०२० मध्ये बेंगलोर संघाकडून खेळताना खास कामगिरी केली नाही. पूर्ण हंगामात २ सामने खेळताना त्याने एकही विकेट विकेट घेतली नाही. तत्पुर्वी आयपीएल २०१९ मध्येही बेंगलोरकडून ११ सामने खेळताना त्याने अवघ्या ८ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या प्रदर्शनाला पाहता यंदा बेंगलोरने यादवला संघातून डच्चू दिला.
त्यानंतर यादवने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन बेंगलोर संघाला अनफॉलो केले अन् अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई संघाला फॉलो केले. एवढेच नव्हे तर, यादवने चेन्नईला वैयक्तिकपणे फॉलो केल्यानंतर चेन्नईनेही यादवला फॉलो करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधान आले आहे. चेन्नई संघ या ३३ वर्षीय वेगवान गोलंदाजाला खरेदी करणार आहे, असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
बेंगलोरने कायम आणि मुक्त केलेले खेळाडू
विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना कायम केले आहे. तर १० खेळाडूंना मुक्त केले आहे. कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे.
तर करारातून मुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये यादवसह मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना यांचा समावेश आहे. पार्थिव पटेल निवृत्त झाल्याने आणि डेल स्टेन उपलब्ध नसल्याने आपोआप संघातून मुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमुळे ‘हा’ परदेशी क्रिकेटर झाला मालामाल, कमाई ऐकून उंचावतील तुमच्या भुवया
अँडरसनची कमाल! आशिया खंडात ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज