जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टच्या कारकिर्दीमागे क्रिकेटचा मोठा हात आहे. बोल्टने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला. बोल्टने एका मुलाखतीदरम्यान हा गौप्यस्फोट केला. बोल्ट एक धावपटू बनण्यापूर्वी क्रिकेट खेळायचा. त्यावेळी त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला धावपटू बनण्याचा सल्ला दिला होता, असे त्याने स्वतः या मुलाखतीमध्ये सांगितले. क्रिकेट प्रशिक्षकांनी त्याला दिलेल्या या सल्ल्यानंतर त्याने कारकीर्द रनिंगमध्ये बनवण्याचे ठरवले आणि यश मिळवले.
बोल्टने त्याला क्रिकेट प्रशिक्षकांनी दिलेला सल्ला गांभीर्याने घेतला आणि त्याचे परिणाम आज जगासमोर आहे. त्याने रनिंगमध्ये आतापर्यंत आठ ऑलिम्पिक पदके आणि ११ वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. बोल्ट रनिंगमध्ये आजवरचा सर्वोत्तम धावपटू मानला जातो. त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत मिळवलेल्या यशाची बरोबरी दुसरा एखादा धावपटू करू शकेल, याची खूपच कमी शक्यता आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोल्टने त्याचा क्रिकेटशी असलेल्या संबंधाचा खुसाला केला. त्याने मुलाखतीत सांगितले की, “माझा देश जमैकामध्ये जास्त लोक एक तर क्रिकेट किंवा फुटबॉललाच पसंती देतात. माझ्या वडिलांना क्रिकेट जास्त आवडत होते. मलादेखील वडिलांकडे पाहून क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली होती. वडील स्वतः क्रिकेट खेळायचे. क्रिकेट खेळताना माझी धावण्याची गती पाहून प्रशिक्षकांनी धावण्यामध्ये कारकिर्द करण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आणि त्यानंतर मी एकापाठोपाठ एक जागतिक विक्रम करत गेलो.”
मुलाखतीच्या शेवटी बोल्टला रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. बोल्टला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्यातील त्याचा आवडता क्रिकेटपटू निवडण्यास सांगितले. या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “लारा कॅरेबियन स्टार आहे, त्यामुळे मी त्याला निवडेल.” तसेच, त्याला मेस्सी आणि रोनाल्डो यांच्यातील आवडता फुटबॉलपटू देखील निवडण्यास सांगितले गेले. या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने रोनाल्डोला त्याचा आवडता फुटबॉलपटू म्हटले.