कोरोना व्हायरसच्या संकटाचा अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक मोठ्या स्पर्धा एकतर रद्द झाल्या किंवा स्थगित झाल्या. तर काही स्पर्धांमध्ये बदल झाले. नुकतेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (यूडब्ल्यूडब्ल्यू) यंदा कोविड -१९ मुळे विश्व कुस्ती चॅम्पियनशीप न होण्याच्या परिस्थितीत वैयक्तिक विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यूडब्ल्यूडब्ल्यूने मंगळवारी(१० नोव्हेंबर) म्हटले आहे की ‘यूडब्ल्यूडब्ल्यूने विश्व कुस्ती चॅम्पियनशीप २०२०साठी काही निकष ठेवले होते. त्यानुसार मागीलवर्षी आयोजित करण्यात आलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भाग घेणाऱ्या १० पैकी कमीतकमी ८ देशांनी आणि ७० टक्के खेळाडूंनी यंदा सहभागी व्हावे, असे निकष होते. पण कोविड-१९ मुळे बऱ्याच देशात प्रवासाची बंदी असल्याने हे निकष पाळणे शक्य झाले नाही.’
यावर्षी १२ ते २० डिसेंबरदरम्यान सार्बियामधील बेलग्रेड येथे विश्व कुस्ती चॅम्पियनशीप होणार होती. पण आता ही स्पर्धा रद्द झाली आहे. या स्पर्धेतून अमेरिका आणि जपानने आधीच नावे मागे घेतली होती. तर भारतीय कुस्तीपटूंना मात्र यामुळे धक्का बसला आहे. त्यांनी स्पर्धेची तयारी सुरु केली होती.
वैयक्तिक विश्वचषक बेलग्रेड येथेच आयोजित केला जाईल. या स्पर्धेच्या तारखा अजून निश्चित करण्यात आलेल्या नाही. एकूण ३० प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेचे बक्षीस रक्कम ३००००० स्विस फ्रान्स असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
साक्षी मलिकने रिओ ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ‘अशी’ घेतली होती मेहनत
सात महिन्यांनंतर भारतीय महिला कुस्तीपटूंच्या सरावाला सुरवात
विश्व कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ‘या’ देशाचा संघ नाही होणार सहभागी