---Advertisement---

वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! आयपीएलमध्ये केकेआरसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

On: शनिवार, एप्रिल 18, 2026 10:31 AM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने अखेर आयपीएल २०२६ मध्ये आपले विकेटचे खाते उघडले आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्धच्या (जीटी) सामन्यात वरुणने आपल्या ४ षटकात ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या दोन विकेट्ससह त्याने केकेआरसाठी खास शतक केले. केकेआरसाठी आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेणारा वरुण पहिला भारतीय ठरला आहे.

वरुण केकेआरकडून २०२० पासून खेळत आहे. गुजरातचा स्फोटक फलंदाज जोस बटलर ही त्याची १०० वी विकेट ठरली, त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरला बाद केले. त्याने केकेआरसाठी ही कामगिरी ८७ सामन्यात पूर्ण केली. त्याचबरोबर तो केकेआरसाठी १०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तिसराच खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी सुनील नरेन (१९६) आणि आंद्रे रसेल (१२२) यांनी ही कामगिरी केली आहे. रसेल आयपीएलमधून निवृत्त झाला असून सूनील सध्या संघात आहे.

वरुणची आयपीएलमधील एकूण कामगिरी पाहिली तर त्याची सरासरी २४.६४ आणि इकॉनॉमी रेट ७.६६ एवढा आहे. त्याबरोरच त्याने एका सामन्यात ५ विकेट्स आणि एकदा चार विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला सामना पंजाब किंग्जकडून केकेआरविरुद्ध खेळला होता. २०१९ त्या हंगामात त्याने एक विकेटही घेतली होती.

सामन्यात काय घडले हे पाहिले तर, जीटीविरुद्ध केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅमेरॉन ग्रीनच्या ७९ धावा यामुळे केकेआरने २० षटकात १० विकेट्स गमावत १८० धावा केल्या. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जीटीकडून मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. कगिसो रबाडाने सर्वाधिक अशा ३ विकेट्स घेतल्या. तसेच प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना जीटीचा कर्णधार शुबमन गिलने ५० चेंडूत ८६ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याने साई सुदर्शनसोबत (२२ धावा) पहिल्या विकेटसाठी ५७ धावा आणि जोस बटलरसोबत (२५ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. त्यामुळे गुजरातने हा सामना दोन चेंडू आणि ५ विकेट्स शिल्लक राखत जिंकला. केकेआरचा हा या हंगामातील पाचवा पराभव ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---