देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी सध्या विविध शहरांमध्ये खेळली जात आहे. भारतीय संघातील पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिखर धवन, केदार जाधव, रॉबिन उथप्पा यासारखे खेळाडू ही स्पर्धा गाजवत असताना, काही तरुण खेळाडूंनी देखील या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करत वाहवा मिळवली आहे. या यादीमध्ये आता मध्यप्रदेशचा सलामीवीर वेंकटेश अय्यरचे नाव देखील सामील झाले आहे.
वेंकटेश अय्यरची तुफानी खेळी
विजय हजारे ट्रॉफीतील ब गटाचे सामने इंदोर येथे खेळले जात आहेत. आज (२८ फेब्रुवारी) सुरू झालेल्या मध्यप्रदेश विरुद्ध पंजाब सामन्यात मध्यप्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ३ गडी गमावून ४०२ धावा फटकावल्या.
मध्यप्रदेशकडून सलामीवीर वेंकटेश अय्यर याने अवघ्या १४६ चेंडूमध्ये २० चौकार व ७ षटकारांच्या सहाय्याने १९८ धावांची तुफानी खेळी केली. ४७ व्या षटकात धावबाद झाल्याने त्याचे द्विशतक हुकले. दोन आठवड्यांपूर्वी चेन्नई येथे झालेल्या आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने २० लाख रुपयांची बोली लावत वेंकटेशला आपल्या संघात सामिल करुन घेतले होते.
मध्यप्रदेशकडून वेंकटेश व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात निवडल्या गेलेल्या रजत पाटीदार याने ५९ चेंडूत ५४ तर आदित्य श्रीवास्तव याने ५६ चेंडूमध्ये ८८ धावांची खेळी करत संघाला ४०० पार मजल मारण्यास मदत केली.
अभिषेकचे शतक पण पंजाबचा पराभव
भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने देखील तुफानी सुरुवात केली. युवा अष्टपैलू आणि सलामीवीर अभिषेक शर्मा याने अवघ्या ४९ चेंडूमध्ये १०४ धावा कुटून पंजाबला सामन्यामध्ये जिवंत ठेवले. मात्र, अभिषेक बाद झाल्यानंतर पंजाबचे फलंदाज फार खास काही करु शकले नाहीत. पंजाबचा डाव ४२.३ षटकात २९७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे मध्यप्रदेशने १०५ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच ना भावा! उथप्पाची पुन्हा एकदा ताबडतोड फलंदाजी, १० षटकारांसह साजरे केले तुफानी अर्धशतक
चोप चोप चोपणार!! आगामी टी२० मालिकेत ‘हे’ भारतीय फलंदाज पाडणार धावांचा पाऊस
वाढदिवस विशेष : कर्णधारपद नाकारतच बोर्डाची झाली खप्पामर्जी अन् अकाली संपली अझर मेहमूदची कारकीर्द