येत्या एप्रिल महिन्यापासून आयपीएल २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सत्रात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळेल हे जवळपास नक्की आहे. अशातच सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत खेळाडूंकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात, खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. त्यातही केरळकडून खेळणाऱ्या दोन दिग्गज खेळाडूंनी आपल्या कामगिरीची सर्वांनाच दखल घ्यायला लावली आहे.
आयपीएल २०१३ स्पर्धेत निर्बंध घातल्यानंतर तब्बल ८ वर्षांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू पाहणाऱ्या श्रीसंतने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बिहार संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात ४ गडी बाद केले आहेत. केरळच्या गोलंदाजीसमोर बिहार संघाला ४० षटकांत अवघ्या १४८ धावा करण्यात यश आले. हे आव्हान अवघ्या ८.५ षटकात पूर्ण करत केरळ संघाने सामना जिंकला. या विजयात रॉबिन उथप्पानेही तुफानी अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
श्रीसंतची धारदार गोलंदाजी
या सामन्यात बिहारच्या संघाला प्रथम फलंदाजी करतांना अवघ्या १४८ धावा करण्यात यश आले. केरळ संघाकडून अनुभवी श्रीसंत भेदक मारा करत होता. त्याने ९ षटकात ३० धावा देत ४ गडी बाद केले. यात त्याने २ निर्धाव षटकं देखील फेकले. यासोबतच जलज सक्सेनाने ३ गडी बाद केले तर, निधीशला २ आणि अक्षय चौहान याला १ गडी बाद करण्यात यश आले.
उथप्पाने ३२ चेंडूवर ठोकल्या ८७ धावा
रॉबिन उथप्पाने केरळ संघाकडून खेळताना बिहार संघाविरुद्ध अवघ्या ३२ चेंडूत ८७ धावांची खेळी केली आहे. त्याने या खेळीत ४ चौकार आणि १० षटकार ठोकले.
बिहार संघाने दिलेल्या १४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीसाठी आलेल्या रॉबिन उथप्पा आणि विष्णू विनोद यांनी चांगली सुरुवात मिळवून दिली होती. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी एकूण ७६ धावांची भागीदारी झाली. यात विष्णु विनोद ताबडतोड १२ चेंडूत ३७ धावा करत बाद झाला. त्यांनतर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनने देखील ९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह नाबाद २४ धावा केल्या आणि केरळ संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी
रॉबिन उथप्पा हा येत्या आयपीएल २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे सध्या उथप्पाच्या फॉर्ममुळे चेन्नई संघ आनंदी असेल. कारण उथप्पा गेल्या काही सामन्यांत केरळकडून चांगली फलंदाजी करत आहे. त्याने ५ सामन्यात २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चोप चोप चोपणार!! आगामी टी२० मालिकेत ‘हे’ भारतीय फलंदाज पाडणार धावांचा पाऊस
वाढदिवस विशेष : कर्णधारपद नाकारतच बोर्डाची झाली खप्पामर्जी अन् अकाली संपली अझर मेहमूदची कारकीर्द
आयसीसी कसोटी क्रमवारी : आर अश्विनची तीन स्थानांनी प्रगती, तर ब्रॉड-अँडरसन यांची घसरण