पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून बुधवारी (7 ऑगस्ट) भारतीयांसाठी एक धक्कादायक बातमी आली. कुस्तीपटू विनेश फोगटनं महिलांच्या 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश करून पदक निश्चित केलं होतं. मात्र सामन्यापूर्वी वजन जास्त भरल्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं. यासह विनेशचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्नही भंगलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट 50 किलो वजनी गटात उतरली होती. मंगळवारी तिनं उपांत्य फेरीत विजय मिळवला. यानंतर तिला बुधवारी अंतिम सामना खेळायचा होता. त्यापूर्वी नियमानुसार विनेशचं वजन करण्यात आलं, ज्यामध्ये तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं. यामुळेच विनेशला अपात्र ठरवण्यात आलंय.
आता चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, असं काय झालं ज्यामुळे विनेशला एका रात्रीतून स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागलं? विनेश ज्या नियमामुळे बाहेर झाली, त्याबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या नियमाबद्दल माहिती देतो.
वास्तविक, कुस्तीमध्ये वजनाच्या श्रेणी असतात. म्हणजे एका कुस्तीपटूला समान वजनाच्या पैलवानाशी लढत द्यावी लागते. विनेशनं 50 किलो वजनी गटात प्रवेश केला होता. अशा परिस्थितीत विनेश आणि समोरचा पैलवान या दोघांचं वजन 50 किलो असायला हवं होतं. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ला हे नियम बनवण्याचे अधिकार आहेत.
UWW च्या आर्टिकल 11 नुसार, मॅचमध्ये प्रवेश करण्यापूर्वी टीम लीडरला ‘फायनल ऍथलीट्स’चं नाव द्यावं लागेल, जे सामना खेळतील. ही माहिती अगोदर द्यावी लागेल. प्रत्येक सामन्यापूर्वी खेळाडूंचं वजन केलं जातं. सामन्याच्या एक दिवस आधी 12 तासापर्यंत वजनाचा तपशील सादर करावा लागतो. स्वतःच्या वजन श्रेणीपेक्षा इतर वजन श्रेणीतील कुस्तीपटूंशी सामना खेळता येत नाही.
नियमानुसार, वजन मर्यादेचं पालन न करणाऱ्या खेळाडूला स्पर्धेतून बाहेर केलं जातं. याशिवाय, जर एखाद्या खेळाडूनं पहिल्या किंवा दुसऱ्या वेळी वजन केलं नाही, तरी देखील तो अपात्र ठरतो. त्याला कोणतीही रँक न देता शेवटच्या स्थानावर ठेवण्यात येतं. वजन करताना ‘सिंगलेट’ नावाचा एकच पोशाख घालण्याची परवानगी आहे. वजन करताना स्पर्धकाची नखंही व्यवस्थित कापली गेली पाहिजेत. संपूर्ण वजन प्रक्रियेमध्ये कुस्तीपटू त्यांना पाहिजे तितक्या वेळा वजन करू शकतात.
हेही वाचा –
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
“विनेशविरुद्ध कट रचला, यामागे सरकारचा हात”; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
ब्रेकिंग बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र!