टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सुपर 12 फेरीच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) संघ आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून सामना जिंकला. मागील विश्वचषकात पाकिस्तानने भारताला 10 गड्यांनी पराभूत केले होते. आता या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत बदला घेतला. या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला. नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने अशक्यप्राय वाटणारा विजय अक्षरशा खेचून आणला. मागील पाच विश्वचषकात विराट हा पाकिस्तान विरुद्ध नेहमीच भारतीय संघाचा सर्वात मोठा मॅचविनर राहिला आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होते.
केएल राहुल दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर विराट फलंदाजासाठी मैदानात उतरला. तो मैदानात आल्यानंतर सातव्या षटकापर्यंत भारताने चार गडी गमावले. त्यानंतर त्याने हार्दिक पंड्यासह 103 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत 53 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावांची खेळी केली. विराटला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केवळ हाच सामना नव्हेतर, मागील पाच टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाचा नायक हा विराटच राहिला आहे. 2012 विश्वचषकावेळी त्याने 61 चेंडूवर नाबाद 78 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 2014 विश्वचषकात नाबाद 36 तर, 2016 विश्वचषकात नाबाद 55 धावा त्याने चोपलेल्या. विशेष म्हणजे हे तीनही सामने भारतीय संघाने जिंकले होते. मागील वर्षीच्या विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यावेळी देखील विराट भारतीय संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने या सामन्यात 57 धावांची खेळी केलेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध मॅचविनिंग खेळी करून, त्याने आपण पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे तारणहार असल्याचे सिद्ध केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सव्याज परतफेड! विराटच्या ऐतिहासिक खेळीने मेलबर्नमध्ये पाकिस्तान चारीमुंड्या चित; विश्वचषकात विजयी सुरुवात
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल