आयपीएलच्या या हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाची खूप चर्चा झाली. यावर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपलं मत नोंदवलं आहे. आता या संदर्भात टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचं वक्तव्य समोर आलं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं या नियमाला विरोध केला होता. विराटनं देखील आता रोहितच्याच सुरात सुर मिसळला आहे. विराट कोहली या नियमामुळे गोलंदाजांवर पडणाऱ्या दबावाबाबत बोलला. उल्लेखनीय म्हणजे, या आयपीएल हंगामात ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे संघांना टीममध्ये अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाज समाविष्ट करण्याची संधी मिळाली. यामुळे याचा फायदाही झाला. तथापि, अनेक दिग्गजांनी या नियमाबद्दल नाराजी व्यक्त केली. यामुळे अष्टपैलू खेळाडूंचं नुकसान होत असल्याचं त्यांचं मत आहे.
यावर बोलताना विराट कोहली म्हणाला, “मी रोहित शर्माशी पूर्णपणे सहमत आहे. इम्पॅक्ट खेळाडूंच्या नियमामुळे खेळ अशा टप्प्यावर पोहोचला आहे की, आपल्याला प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार पडेल, असं गोलंदाजांना वाटतं.” विराट कोहली पुढे म्हणाला की, “खेळात याचा इतका वरचष्मा होता कामा नये. शेवटी प्रत्येक संघात जसप्रीत बुमराह किंवा राशिद खानसारखे गोलंदाज नसतात. मला माहित आहे की जय शाह इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा आढावा घेणार आहेत.”
आयपीएलच्या गेल्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू करण्यात आला होता. याद्वारे संघ त्यांच्या सोयीनुसार सुरुवातीच्या प्लेइंग 11 मधून कोणताही गोलंदाज किंवा फलंदाज बदलू शकतात. या नियमामुळे या हंगामात अष्टपैलू खेळाडूंचा रोल फारच कमी झाला. त्यामुळे या नियमावरही जोरदार टीका होत आहे. इम्पॅक्ट प्लेअर नियम खेळासाठी योग्य नसल्याचं अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी, पुढील हंगामात या नियमाचा आढावा घेतला जाईल, असं सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत, पर्पल कॅपवर बुमराह नाही तर ‘या’ भारतीय गोलंदाजाचा कब्जा
हार्दिक पांड्याला बीसीसीआयनं केलं निलंबित! रोहितसह मुंबई इंडियन्सच्या इतर खेळाडूंनाही दंड