जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळला. एजबॅस्टन येथील दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवशीच विजय मिळवून न्यूझीलंडने मालिका आपल्या नावे केली. बऱ्याच अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळताना न्यूझीलंडने इंग्लंडला मात दिली. या मालिकेत पराभव होताच इंग्लंडचा कर्णधार व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ पैकी एक असणारा जो रूट याचा समावेश एका अनोख्या यादीत झाला.
त्या यादीत रूटचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ यांना आधुनिक क्रिकेटमधील ‘फॅब फोर’ मानले जाते. या सर्वांनी प्रत्येक देशांत आपापल्या देशाचे नेतृत्व केले. तसेच त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळाले आहे.
सर्व खेळाडू कर्णधार म्हणून यशस्वी असले तरी, त्यांना काही वेळा आपल्या घरच्या मैदानावर अपयश आले आहे. मात्र, यादरम्यान विराट कोहली हा ‘फॅब फोर’ पैकी एकमेव असा कर्णधार आहे जो घरच्या मैदानांवर एकही कसोटी मालिका हरला नाही. स्टीव स्मिथ कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाला होता. तर, विलियम्सनच्याच नेतृत्वात न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्याचप्रमाणे, आता रूटनेदेखील घरच्या मैदानांवर कसोटी मालिका गमावली आहे.
चॅम्पियनशिप जिंकण्याची विराट-विलियम्सनकडे संधी
कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकून सर्वोत्तम कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी भारताचा कर्णधार विराट कोहली व न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांच्याकडे आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपन: जोकोविचने दुसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद; ‘हे’ विक्रमही केले नावावर
आयसीसी स्पर्धांबाबत बीसीसीआयने बदलली ‘ही’ भूमिका, मात्र आता आयपीएल आयोजन येणार अडचणीत