टी२० आणि एकदिवसीय कर्णधारपदानंतर विराट कोहलीने आता भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद देखील सोडले आहे. शुक्रवारी दक्षिण अफ्रिकेकडून कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर विराटने हा निर्णय घेतला आहे. शनिवारी (१५ डिसेंबर) विराट कोहली (virat kohli) याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्याची घोषणा केली. आता अशी माहिती समोर येत आहे की, शनिवारी ही घोषणा करण्यापूर्वी त्याने संघातील सहकाऱ्यांना याविषयी माहिती दिली होती.
माध्यमांतील वृत्तानुसार अशी माहिती समोर येत आहे की, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळला गेलेल्या शेवटचा सामना संपल्यानंतर विराटने ड्रेसिंग रूममध्ये कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याविषयी माहिती संघातील इतर खेळाडूंना दिली होती. सोबतच त्याने सहकाऱ्यांकडे एक विनंती देखील केली होती.
एका प्रमुख वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी केपटाऊन कसोटीत झालेल्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये भारतीय संघाची बैठक झाली. यावेळी विराटने त्याच्या निर्णयाची माहिती दिली होती. माहितीनुसार, विराटने ही बैठक संपल्यानंतर सहकाऱ्यांना सांगितले की, तो संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्याचा हा निर्णय ऐकून त्यावेळी उपस्थित असलेले सर्वजण हैराण झाले होते. यावेळी विराट सहकाऱ्यांना विनंती करत म्हटला होता की, “मला तुमच्याकडून फक्त थोडी मदत हवी आहे. कृपया, ड्रेसिंग रूम बाहेर कोणासोबतच ही गोष्ट शेअर करू नका.”
विराट कसोटी कर्णधारपद सोडताना काय म्हणाला
दरम्यान विराटने कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, ‘संघाला योग्य मार्गाने पुढे नेण्यासाठी मागची ७ वर्षे मी कठोर परिश्रम आणि चिकाटीने प्रयत्न केले. मी प्रामाणिकपणे काम केले आणि यात कसलीही कसर सोडलेली नाही. पण प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. भारताचा कसोटी कर्णधार म्हणून थांबण्याची माझी वेळ आली आहे.’
पोस्टमध्ये विराटने बीसीसीआयचे आभार मानले. तसेच एमएस धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवण्यासाठी एमएस धोनीचे देखील आभार व्यक्त केले. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा विराटने आवर्जून उल्लेख केला.
महत्वाच्या बातम्या –
‘तो रोबोट हलवणं थांबवा’, गोलंदाजी करताना अचानक ओरडला स्टुअर्ट ब्रॉड, पाहा नक्की काय झालं
भारतीय क्रिकेटचा ‘राजकुमार’ विराट! मात्र, नेतृत्व सोडताना नेहमीच झाली अवहेलना
पाचवी ऍशेस कसोटी दुसऱ्याच दिवशी रोमांचक अवस्थेत; स्मिथच्या खांद्यावर ऑस्ट्रेलियाची जबाबदारी
व्हिडिओ पाहा –