Loading...

विराट की स्मिथ? कुणाचा प्रवास सुरु आहे महान खेळाडूकडे

-शरद बोदगे

क्रिकेट म्हटलं की समकालीन खेळाडूंची तुलना ही ओघानेच येते. कधी कधी ही तुलना दोन वेगवेगळ्या काळात खेळलेल्या खेळाडूंचीही होत असते. अगदी आताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर सचिन-विराटची होणारी तुलनाच घ्या ना!

इतिहासात डोकावताना अगदी थोडं मागे गेलं तर सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा, सनथ जयसुर्या, जॅक कॅलिस आणि रिकी पाॅटींग यांची मोठ्या प्रमाणावर तुलना होत असे. यात कोण पुढे गेले किंवा कोण श्रेष्ठ ?  हे ज्याने त्याने वेगवेगळे निकष लावुन ठरवलंही होतं.

सध्याही अशीच काही तुलना गेले २-३वर्ष भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिवन स्मिथ, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांच्यात होतं होती. परंतु आता ही तुलना विराट आणि स्मिथवर येऊन ठेपल्याचे आपल्याला पहायला मिळते.

या खेळाडू हे खऱ्या अर्थाने समकालीन आहे असंच म्हणावं लागेल. विराट ३१, स्मिथ ३०, विलीयम्सन २९ आणि रुट २९ ही त्यांची सध्याची वयं. यात विराटने २००८, स्मिथ २०१०, केन विलियमसन २०१० आणि रुट २०१२ यावर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. असे असले तरी विराटला आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कसोटी पदार्पणानासाठी ३ वर्ष वाट पहावी लागली. अन्य तीन खेळाडूंच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. स्मिथने तर कारकिर्द गोलंदाज म्हणून सुरु केली होती आणि तो फलंदाजीलाही ८व्या क्रमांकावर येत होता.

Loading...

केवळ कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट! असं म्हणण्याचा काळ आता मागे पडला आहे. प्रत्येक देश आता विविध खाजगी लीग सामने आयोजीत करतो. तसेच विविध विश्वचषकांना तसेच आयसीसीच्या स्पर्धांना गेल्या १०-१२ वर्षात सुरुवात झाली आहे. त्यामुळे क्रिकेटचे प्रकार दोनवरुन चारवर गेले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे प्रकार कसोटी, वनडे आणि टी२० असेच आहेत.

यात गेले काही वर्ष अगदी टू द पाॅईंट सांगायचं असेल २०१२पासून विराट क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जबरदस्त कामगिरी करत आहे. तर अन्य खेळाडू हे एक किंवा दोन प्रकारात विराटसारखी कामगिरी करत आहेत.

स्मिथचंच उदाहरण घ्यायचं झालं तर त्याने विराटपेक्षा ११ कसोटी सामने कमी खेळूनही विराटपेक्षा कसोटीत जास्त धावा केल्या आहेत. विराटने ८४ कसोटीत ५४.९८च्या सरासरीने ७२०२ तर स्मिथने ७३ कसोटीत ६२.८४च्या सरासरीने ७२२७ धावा केल्या आहेत. असे असले तरीही संघाला सामने जिंकून देताना स्मिथची हीच सरासरी तब्बल ८१ची होती तर विराट याच सरासरीत ६०.५०वर अडकतो. विराटने संघाला ४४ सामने जिंकून देताना ३८७२ धावा केल्या आहेत तर स्मिथने ३९ सामने जिंकून देताना ४४५५ धावा केल्या आहेत. भारतात खेळताना विराटची सरासरी ६८.४२ आहे तर परदेशात खेळताना हीच सरासरी ४६.१२वर येते. अगदी टिपीकल भारतीय फलंदाजांसारखीच ही सरासरी आहे. दुसऱ्या बाजूला स्मिथची सरासरी परदेशात ६०.१५ तर मायदेशात ७१.१४ अशी आहे. 

Photo Courtesy: Facebook/icc

विराटने कसोटीत २७ शतकांपैकी ७ द्विशतकं केली आहेत. तर स्मिथने २६ शतकांपैकी २ द्विशतकं केली आहेत. अर्थात स्मिथ कसोटीत विराटच्या पुढे जरी असला तरी या दोन खेळाडूंमध्ये खूपही अंतर नक्कीच नाही.

Loading...

वनडेत मात्र विराटचाच बोलबाला-

Photo Courtesy: Twitter/ ICC

वनडे आणि विराट हे एक वेगळंच रसायन गेल्या काही वर्षात जगभरातील क्रिकेटप्रेमींना पहायला मिळालं आहे. विराट फलंदाजीला आल्यावर तो नाबादच परत येईल किंवा शतकी खेळी करेलच असेच अनेक वेळा वाटते. एक अतिशय महत्त्वाचा परंतु फार कुणाच्या लक्षात न आलेला विक्रम म्हणजे विराटने २३८ वनडे डावातील तब्बल १०० डावांत ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक २.३८व्या डावात विराट हमखास ५० किंवा अधिक धावा करतोच. या १००पैकी ४३ खेळींचे रुपांतर विराट शतकात करण्यात यशस्वी झाला आहे.

विराटने वनडेत २४५ सामन्यात तब्बल ५९.८५च्या सरासरीने ११७९२ धावा केल्या आहेत. तर स्मिथने २०१०पासून १२१ वनडेत ४२.९७च्या सरासरीने ४०३९ धावा केल्या आहेत. विराटने स्मिथच्या जवळपास तीनपट वनडे धावा आताच केल्या आहेत. स्मिथने पुढील ८ वर्षांत प्रत्येक वर्षी १ हजारपेक्षा जास्त धावा केल्या तरी विराटचा वनडेतील धावांचा विक्रम मोडणे त्याला केवळ अशक्यच आहे. याठिकाणी रुटने ५८५६ तर केन विलियमसनने ६१३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट या दोन खेळाडूंच्याही बराच पुढे आहे. अगदी सर्व परिमाण वापरुन पाहिली तरी विराटच्या वनडे धावांचा विक्रम या त्रिमुर्तींकडून मोडला जाईल असे सध्यातरी दिसत नाही.

या ठिकाणी विराटला मात्र सचिनचा ४६३ सामन्यातील १८४२६ धावांचा विक्रम नक्कीच खुणावत असणार. वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता ६व्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर या यादीत कुमार संगकारा असून त्याने ४०४ सामन्यात १४२३४ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला दुसऱ्या स्थानावर यायला सध्याचा फाॅर्म पाहता जास्त वर्ष नक्कीच लागणार नाहीत.

विराटने वनडेत ४३ शतके आणि ५७ अर्धशतके केली आहेत तर स्मिथने ९ शतके आणि २४ अर्धशतके केली आहेत.

टी२०मध्ये विराटच्या स्मिथच्या पाचपट धावा-

Photo Courtesy: Twitter/ ICC

 

आंतरराष्ट्रीय टी२०चा विचार करता विराटने स्मिथच्या पाचपट धावा केल्या आहेत. विराटने ७७ टी२० सामन्यात ५२.७३च्या सरासरीने २६८९ धावा केल्या आहेत. यात त्याने २४ अर्धशतके केली आहेत. क्रिकेटच्या या वेगवान प्रकार विराट जवळपास तिसऱ्या डावात अर्धशकती खेळी करतोच. असे असले तरी या प्रकारातील शतकं हे विराटवर रुसलेलेच आहे. अनेक मोठ्या खेळी करुनही विराटला त्याचे शतकी खेळीत रुपांतर करता आलेले नाही. स्मिथने या वेगवान प्रकारात  ३६ सामन्यात २७.४८च्या सरासरीने ४ अर्धशतकांच्या मदतीने ५७७ धावा केल्या आहेत.

जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायची वेळ येते तेव्हा अनेक खेळाडूंची सरासरी कमी होते. खेळाडूंची सरासरी ही मर्यादीत षटकांच्या प्रकारात प्रथम फलंदाजी अतिशय चांगली असते परंतु हीच सरासरी जेव्हा खेळाडू धावांचा पाठलाग करतात तेव्हा मात्र हमखास घसरते. विराटच्या बाबतीत मात्र हे अगदी उलटे घडते.

Loading...

वनडेत विराटची सरासरी ही ५९.८६ची असून लक्ष्याचा पाठलाग करताना हीच सरासरी ६८.८६ होते तर लक्ष्याचा  विजयी पाठलाग करताना ही सरासरी तब्बल ९६.२१ वर जाते.

तर टी२०मध्ये विराटची सरासरी ही ५२.७३ असून लक्षाचा पाठलाग करताना हीच सरासरी ८८.५२ अशी होते तर लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना ती तब्बल १२३.९०वर जाते. विशेष म्हणजे कर्णधार असताना विराटची हीच आकडेवारी टिकून रहाते. अशी ही ‘आकडेवारी न भूतो न भविष्यति’ अशीच आहे.

Photo Courtesy: Twitter/ BCCI

स्मिथला २०१८-१९ या एकवर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळायला मिळाले नाही. बंदी आल्यामुळे तो या काळात सामने खेळू शकला नाही. जर या काळात असे झाले नसते तर स्मिथची कसोटी कारकिर्द आणखी बहरलेली दिसली असती. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्येही नक्कीच थोडाफार चांगला बदल दिसला असता. याला कारण म्हणजे स्मिथचा या एक वर्षात कोणतही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळता टिकून राहिलेला फाॅर्म.

Photo Courtesy: Twitter/ ICC

अगदी लेखाच्या सुरुवातीला सांगितल्या क्रिकेट हे आता बदलले आहे आणि केवळ कसोटी किंवा वनडेमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे एखाद्या खेळाडूला महान म्हणण्याचे दिवस आता संपले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदही क्रिकेटच्या प्रचार प्रसारासाठी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला पाठींबा देताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच प्रकाराच्या क्रिकेटमध्ये जो खेळाडू चांगली कामगिरी करणार तोच येत्या काळात सर्वश्रेष्ठ समजला जाणार आहे.  क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात म्हणा किंवा २००६च्या काळातील कसोटी आणि वनडे प्रकार म्हणा, सर्व प्रकारात एवढी समतोल कामगिरी करणारा विराट सोडून जगाच्या पाठीवर अन्य कोणताही क्रिकेटर झाला नाही किंवा सध्या खेळताना दिसत नाही. डेव्हिड वाॅर्नर काहीशी अशी कामगिरी करताना जरी दिसत असला तरी विराटच्या तुलनेत तो बराच मागे आहे. तसेच तो विराटपेक्षा २ वर्षांनी मोठाही आहे. स्मिथचा विचार केला तर त्याची कसोटी कारकिर्द अफलातून आहे परंतु मर्यादीत षटकांत तो विराट सोडाच सध्या खेळत असलेल्या अनेक खेळाडूंच्या बराच मागे आहे. तसेच या प्रकारात त्याला विराट गाठणे केवळ अशक्य वाटते.

क्रिकेट समिक्षक, समालोचक किंवा चाहते सतत या दोघांची तुलना करताना दिसतात. परंतु बऱ्याच वेळा स्मिथची केवळ कसोटीची कामगिरी विचारात घेऊन ही तुलना करणे म्हणजे विराटवर अन्याय करण्यासारखेच आहे.

Loading...

You might also like
Loading...