आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये जबरदस्त खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (Royal Challengers Bangaluru) चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा टिम डेविड (Tim David), ऑस्ट्रेलियासाठीही धमाल करतो आहे. विराट कोहलीचा (Virat Kohli) हा खास मित्र वेस्ट इंडिजनंतर आता दक्षिण आफ्रिका संघावरही तडाखा देत आहे. बॅक-टू-बॅक सामन्यांत तडाखेबाज अर्धशतकं ठोकून डेविडने आफ्रिकन गोलंदाजांना चांगलंच चोपलं आहे. गेल्या सामन्यात तर त्याने सामनाविजयी खेळी केली होती.
आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत खेळणाऱ्या टिम डेविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 52 चेंडूत 83 धावांची खेळी केली. यात 4 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. डेविडच्या या खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाने 178 धावा उभारल्या आणि 17 धावांनी सामना जिंकला. दुसऱ्या टी20 सामन्यातही डेविडची बॅट जोरात तळपली. त्याने फक्त 24 चेंडूत 50 धावा ठोकल्या, ज्यात 4 चौकार आणि 4 षटकार होते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धही टिम डेविडने जोरदार प्रदर्शन केलं होतं. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 3 सामने खेळले होते. त्यापैकी एका सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नव्हती. दुसऱ्या सामन्यात त्याने फक्त 37 चेंडूत 102 धावांची वादळी खेळी केली होती, ज्यात 6 चौकार आणि 11 षटकार होते. तर तिसऱ्या सामन्यात त्याने फक्त 12 चेंडूत 30 धावा केल्या. या चार खेळींपूर्वी डेविडने आरसीबीसाठी आयपीएल 2025 मध्ये कमाल केली होती.






