---Advertisement---

टी२०मध्ये केवळ धवनलाच करता आलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता विराटचाही समावेश

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 7:00 AM
---Advertisement---

शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सोमवारी(११ ऑक्टोबर) एलिमिनेटरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाताने ४ विकेट्सने विजय मिळवत क्वालिफायर २ सामन्याकडे कूच केली. मात्र, बेंगलोर संघाचा या हंगामातील प्रवास संपला. असे असले तरी, बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बेंगलोरकडून विराट देवदत्त पडीक्कलसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला. त्याने चांगली सुरुवात केली होती. पण १३ व्या षटकात त्याला सुनील नारायणने त्रिफळाचीत केले. विराट बाद झाला तेव्हा त्याने ५ चौकारांसह ३३ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या.

त्यामुळे विराटने टी२० क्रिकेट प्रकारामध्ये ९०० चौकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला. असा कारनामा करणारा तो दुसराच भारतीय ठरला. त्याच्यापूर्वी असा पराक्रम शिखर धवनने केला आहे. शिखरने टी२० क्रिकेटमध्ये आजपर्यंत ३०२ सामन्यांत ९८६ चौकार ठोकले आहेत.

विशेष म्हणजे टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याच्या बाबतीत शिखर ख्रिस गेल पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने ११०५ चौकार टी२० क्रिकेटमध्ये ठोकले आहेत. विराटच्या नावावर आता ३१९ टी२० सामन्यांत ९०१ चौकार झाले आहेत. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये शिखर आणि विराट पाठोपाठ रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३५६ टी२० सामन्यांत ८३० चौकार मारले आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू 
११०५ चौकार – ख्रिस गेल (४४८ सामने)
९८६ चौकार – शिखर धवन (३०२ सामने)
९७३ चौकार – डेविड वॉर्नर (३०६ सामने)
९६७ चौकार – ऍलेक्स हेल्स (३१४ सामने)
९५६ चौकार – ऍरॉन फिंच (३२४ सामने)
९२४ चौकार – ब्रेंडन मॅक्यूलम (३७० सामने)
९०१ चौकार विराट कोहली (३१९ सामने)

बेंगलोरने गमावला सामना 
या सामन्यात बेंगलोरला २० षटकांत ७ बाद १३८ धावाच करता आल्या. बेंगलोरकडून विराटने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त केवळ देवदत्त पडीक्कलला २० धावांचा टप्पा ओलांडता आला. पडीक्कलने २१ धावा केल्या. विराट आणि पडीक्कलमध्ये ४९ धावांची सलामी भागीदारी झाली होती. कोलकाताकडून सुनील नारायणने उत्तम गोलंदाजी करताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर, फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताकडून सांघिक खेळ पाहायला मिळाला. कोलकाताने १९.४ षटकात ६ विकेट्स गमावत बेंगलोरने दिलेले १३९ धावांचे आव्हान पूर्ण केले. कोलकाताकडून शुबमन गिलने सर्वाधिक २९ धावांची खेळी केली. तसेच व्यंकटेश अय्यर आणि सुनील नारायणने प्रत्येकी २६ धावा केल्या. नारायणने फलंदाजीतही उत्तम योगदान देताना ३ षटकारांची बरसातही केली. तसेच नितीश राणाने २३ धावांचे योगदान दिले.

बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

आरसीबी हारली, पण हर्षल पटेलची गोलंदाजीत ऐतिहासिक कामगिरी! चेन्नईच्या ब्रावोची केली बरोबरी

आयपीएलमध्ये ‘मिस्टर ३६०’ची ‘या’ गोलंदाजांपुढे उडते भंबेरी, डिव्हिलिअर्सला सर्वाधिकवेळा बाद करणारे ४ गोलंदाज

केकेआरचा नाद खुळा विक्रम! आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---