सध्या भारतातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीचा हंगाम सुरू झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रमुख संघांमध्ये गणल्या जाणाऱ्या बडोदा संघाचा अनुभवी फलंदाज विष्णू सोलंकी हा मात्र अत्यंत वाईट काळातून जाताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच त्याच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्याचे वडीलही निधन पावले आहेत. अशा परिस्थितीतही त्याने खेळाला व संघाला प्रथम प्राधान्य देत वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला.
रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या राउंडचा सामना बडोदा चंदीगड यांच्यादरम्यान कटक येथे खेळला गेला. अनिर्णित राहिलेल्या या सामन्यादरम्यान विष्णू सोलंकी याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी त्याचे वडील निधन पावले. ते मागील दोन वर्षापासून आजारी होते. संघाच्या व्यवस्थापकांनी त्याला त्याबाबत कल्पना दिली. मात्र, त्याने संघहित लक्षात घेता कटक येथे थांबण्याचा निर्णय घेतल. त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. त्याच्या या धारिष्ट्याचे संघाचा कर्णधार केदार देवधर याने कौतुक केले. तसेच संपूर्ण संघ त्याच्यासोबत असल्याचे देवधर याने सांगितले.
मुलीचेही झाले निधन
विष्णू याच्या पत्नीने ११ फेब्रुवारी रोजी एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, ती नवजात मुलगी अवघ्या काही तासांमध्ये मृत झाली. त्यावेळी विष्णू भुवनेश्वर येथे संघासह होता. त्यानंतर तो बडोदा येथे आपल्या घरी गेला व चार दिवसांमध्ये पुन्हा संघाशी जोडला गेला. बंगाल विरुद्ध पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नाही. मात्र, चंदीगडविरुद्ध त्याने सर्व दुःख विसरून शानदार शतकी खेळी केली. खेळाप्रती असलेल्या त्याच्या या प्रामाणिकतीचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले होते.
महत्वाच्या बातम्या-
शास्त्री गुरुजींचे आधी साहाला समर्थन, आता म्हणतायेत… (mahasports.in)
आयपीएल सुरू होण्याआधीच नवख्या गुजरात टायटन्सला हादरा! करोडपती खेळाडूचा खेळण्यास नकार (mahasports.in)
सचिनसोबत पदार्पण करणारा सलील अंकोला पुढे मोठ्या पडद्यावर झाला पोलीस इन्स्पेक्टर (mahasports.in)